रेल्वे अर्थसंकल्पामध्ये हमालांचे नाव घेऊन त्यांची उपेक्षा केली आहे. देशभरातील मालधक्क्य़ांवर हमालांना प्यायला पाण्याचीही नीट व्यवस्था न करता केवळ नाव व गणवेश बदलून हमालांच्या परिस्थितीत फरक पडणार आहे का, असा प्रश्न महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केला.
रेल्वे अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना डॉ. आढाव म्हणाले, अर्थसंकल्पात हमालांच्या नावाचा केवळ उल्लेख करण्यात आला. या कष्टकरी घटकाला तेवढय़ावरच समाधान मानावे लागणार आहे. रेल्वेला दोन तृतीयांश उत्पन्न मिळवून देणाऱ्या मालवाहतुकीच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ही मालवाहतूक ज्या ठिकाणाहून होते त्या मालधक्क्य़ांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदी सामान्य सुविधांसाठी कुठलीही तरतूद केलेली नाही. मालधक्क्य़ावर नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत महामंडळाने रेल्वेकडे सातत्याने मागणी केली आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनाही निवेदन देण्यात आले होते. रेल्वे मालधक्क्य़ावरील सुविधांसाठी पुरवणी रेल्वे अर्थसंकल्पात तरी तरतूद करावी, अशी महामंडळाची मागणी आहे.
रेल्वे फलाटावरील हमालांना सहायक म्हणून संबोधणार व गणवेशाचा रंग बदलण्याचे रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले आहे. लाल डगलेवाले ही हमालांची ओळख आहे. त्यांच्या ओळखीचा रंग पुसून दुसऱ्या रंगाचा गणवेश देण्याचा निर्णय कशासाठी? कष्टकऱ्यांच्या चळवळीचा रंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल रंगाचे संघाचे संस्कार असलेल्या भाजप सरकारला वावडे आहे का?