पुणे : तब्बल ८३ वर्षांपूर्वी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यात झालेल्या इंग्रजी व्याख्यानाचा मराठी अनुवाद असलेले ‘रानडे, गांधी आणि जीना’ हे सटीप मराठी पुस्तक साधना प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले आहे. राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारपासून (१४ एप्रिल) ही विचार‘साधना’ वाचकांच्या हाती सुपूर्द करण्यात येत आहे.

‘न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या १०१ व्या जन्मदिनी (१८ जानेवारी १९४३) पुण्यात डेक्कन सभेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘रानडे, गांधी अँड जीना’ या विषयावर व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते. गोखले मेमोरिअल हॉलमध्ये झालेल्या व्याख्यानाचे अध्यक्षस्थान तत्कालीन मुंबई कायदेमंडळाचे सदस्य राहिलेले बाळकृष्ण सीताराम कामत यांनी भूषविले होते. तर, उदारमतवादी प्रा. र. पु. परांजपे यांनी आभार मानले होते,’ अशी माहिती साधना प्रकाशनाचे विश्वस्त विनोद शिरसाठ यांनी दिली.

ते म्हणाले, ‘इंग्रजीतून हे भाषण झाले, तेव्हा डॉ. आंबेडकर यांची राजकीय कारकीर्द शिखरावर होती. भारतातील सर्वोच्च नेत्यांमध्ये त्यांची गणना होत होती. मात्र, गांधी आणि जीना यांचे ते प्रखर टीकाकार होते. या पार्श्वभूमीवर, त्यांनी केलेले हे भाषण सर्वदूर वाचले गेले. इंग्रजीत तर ते उपलब्ध होतेच. पण, भारतातील अन्य काही भाषांमध्येही ते गेलेले आहे. आंबेडकरांचे विचार, भूमिका आणि दृष्टिकोन समजून घेण्याच्या दृष्टीने हे भाषण विशेष महत्त्वाचे आहे. हे ध्यानात घेऊन या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली. अवधूत डोंगरे यांनी या भाषणाचा मराठी अनुवाद केला असून, त्याला सविस्तर टीपा जोडून हा दस्तावेज तयार केला आहे.’

‘या भाषणाच्या शीर्षकात तीन ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची नावे असली, तरी प्रत्यक्षात हे भाषण त्या व्यक्तींपेक्षा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आस्थेचे प्रश्न आणि त्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन मांडणारे आहे. आंबेडकरांच्या विचारविश्वाचा गाभा या भाषणात सापडतो. इतिहासाची जडणघडण आणि त्यामधील मानवी कर्तेपणाचे स्थान, राजकीय आणि सामाजिक लोकशाहीचा विचार, सामाजिक सदसद्विवेकबुद्धी, श्रेणीबद्ध विषमतेच्या रूपातील जातिव्यवस्था, माध्यमांचा व्यवहार, धर्माचे मानवी जीवनातील स्थान या विषयांबरोबरच उदारमतवाद, साम्यवाद, समाजवाद, हिंदुत्ववाद या विचारसरणींबद्दलची आंबेडकरांची मतेही या भाषणातून वाचायला मिळतात,’ असे अवधूत डोंगरे यांनी नमूद केले.

पन्नास पानांचे भाषण आणि त्यावरील टीपा दीडशे पानांच्या हा मराठीतील एक अफलातून प्रयोग आहे. केवळ भाषण वाचणे हा बौद्धिक आनंद असेलच, पण त्यावरील अगदी नेमक्या व अर्थपूर्ण टीपांमुळे या भाषणातून मिळणारा बौद्धिक आनंद अनेक पटींनी वाढेल. – विनोद शिरसाठ