…या साऱ्याला मोदी जबाबदार कसे? – डॉ. एस. एल. भैरप्पा

अक्षरधारातर्फे आयोजित ५५० व्या दीपावली शब्दोत्सव ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. भैरप्पा यांच्या हस्ते झाले. उमा कुलकर्णी यांनी भैरप्पा यांची मुलाखत घेतली.

आविष्कार स्वातंत्र्याचा संकोच होतो असे म्हणत पुरस्कार परत करणाऱ्यांपैकी काहीजणांचे साहित्यातील योगदान काय हेही तपासले पाहिजे. डॉ. कलबुर्गी यांची झालेली हत्या ही निंदनीय आहे. पण, कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे आणि मुख्यमंत्री डाव्या विचारांचे आहेत. ज्या घटनेचा निषेध करून पुरस्कार परत केले जातात त्या उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे सरकार आहे. मग या साऱ्याला नरेंद्र मोदी जबाबदार कसे, असा सवाल ज्ञानपीठपुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी गुरुवारी केला. या संदर्भात मोदी काही बोलले तर, केंद्र राज्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणते असा कांगावाही केला जाऊ शकतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
अक्षरधारातर्फे आयोजित ५५० व्या दीपावली शब्दोत्सव ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. भैरप्पा यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्ताने उमा कुलकर्णी यांनी भैरप्पा यांची मुलाखत घेतली. लेखक प्रा. मििलद जोशी, डॉ. सदानंद बोरसे, डॉ. नरसिंह मांडके आणि रसिका राठिवडेकर या वेळी उपस्थित होत्या.  भैरप्पा यांच्या ‘पारखा’ या कादंबरीच्या नव्या आवृत्तीचे आणि ‘सृजन सेतू’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन या प्रसंगी झाले.
भैरप्पा म्हणाले, स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये डाव्यांनी बौद्धिक विश्वाचे नेतृत्व केले. देशातील विद्यापीठे आणि शिक्षणसंस्थांवर डाव्यांचा ताबा होता. डाव्या विचारांची गळचेपी होत असल्याची ओरड तेव्हा झाली नाही. आताच आविष्कार स्वातंत्र्याचा संकोच होत असल्याचे कसे समजले. पुरस्कार परत करणाऱ्यांपैकी अशोक वाजपेयी हे तर काँग्रेसनेते अर्जुनसिंग यांचा उजवा हात मानले जातात. त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान काय हा प्रश्नच आहे. डाव्या विचारांच्या गळचेपीचा मी बळी ठरलो आहे. मला सनातनी म्हणून हिणवले गेले. शारीरिक दुखापत हा अपवाद वगळला तर माझ्यावर शाब्दिक हल्ले केले गेले. एवढेच नव्हे तर माझी पुस्तके वाचू नका, असे म्हणण्यापर्यंत मजल गेली होती. मात्र, सुजाण वाचकांमुळे माझी लेखक म्हणून जडणघडण झाली.
समकालीन वास्तवाला भिडणे हे लेखकाचे काम असते असे काहीजण सांगतात. अस्पृश्यता, बेरोजगारी हे प्रश्न तत्त्वज्ञानाचे आहेत की ते राजकीय, सामाजिक, आर्थिक प्रश्न आहेत हे एकदा ठरवावे लागेल. दृष्टी नसलेल्या साहित्याला अमरत्व प्राप्त होत नाही. प्रश्नांना भिडण्याचे सामथ्र्य अभिजात साहित्यामध्ये असतेच, असेही भैरप्पा यांनी सांगितले.
तरच, भारतीय भाषा विकसित होतील
वैज्ञानिक ज्ञान मातृभाषेत आले तरच भारतीय भाषा विकसित होतील. त्यामुळे भारतीय भाषांमध्ये हे ज्ञान आले पाहिजे यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे, असे मत डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी सांगितले. भारतीय भाषा या कथा, कादंबरी, कविता या माध्यमातून साहित्याची भाषा म्हणून विकसित झाल्या. मात्र, त्या विज्ञानाची भाषा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला इंग्रजी भाषेचा आधार घ्यावा लागतो. कन्नडमध्ये वाङ्मयीन पुस्तकांपेक्षाही वैज्ञानिक पुस्तकांची विक्री अधिक होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dr bhairaappa interview

ताज्या बातम्या