पुणे : ‘शीतयुद्धाच्या काळात जग अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन देशांत विभागलेले असताना स्वतंत्र परराष्ट्र धोरण आखून पं. जवाहरलाल नेहरूंनी तिसरी शक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नेहरूंचा जगात नैतिक दबदबा होता. सध्याचे परराष्ट्र धोरण फसल्याने भारत हतबल झाला आहे. सदाशिव पेठेइतका छोटा मालदिवसारखा देशही आपले ऐकत नाही,’ अशी टीका ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डाॅ. भालचंद्र मुणगेकर यांनी बुधवारी केली.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या वतीने पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘नेहरूप्रणीत भारताच्या विकासाचे प्रतिमान आणि त्याची प्रासंगिकता’ या विषयावर डॉ. मुणगेकर यांचे व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त सचिव अन्वर राजन, डॉ. शिवाजीराव कदम, लक्ष्मीकांत देशमुख, एम. एस. जाधव, रमेश आढाव या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मार्गदर्शक विवेक सावंत अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमात ॲड. शंकर निकमलिखित ‘भारताचा कोहिनूर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

मुणगेकर म्हणाले, ‘भारताला कोणत्या दिशेने पुढे न्यायचे, हे समजलेला एकमेव नेता नेहरू होते. राम मनोहर लोहियांमुळे काँग्रेस व नेहरूविरोधी दृष्टी तयार झाली होती. मात्र, संसदीय लोकशाही, आर्थिक नियोजन, धर्मनिरपेक्षता आणि परराष्ट्र धोरण ही नेहरूंची वैशिष्ट्ये आहेत. नेहरूंना लोकशाही समाजवाद आणायचा होता, असे अनेक अर्थतज्ज्ञांना वाटत होते. मात्र, त्यांना कल्याणकारी राज्य आणायचे होते. पं. नेहरू, सरदार पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राज्यघटनेसाठी मोठे योगदान आहे. रशियन राज्यक्रांतीचा प्रभाव असलेल्या नेहरूंचे भांडवलशाही अर्थव्यवस्था शोषण करणारी व्यवस्था आहे, असे मत होते. नेहरू आणि आइन्स्टाइन यांच्यात चर्चा होत असे. त्यावरून त्यांचा व्यासंग लक्षात येतो. नेहरूंचा प्रत्येक धर्मातील धर्मांधतेला विरोध होता. नेहरू सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहायचे. नेहरूंनी देशात ११७ संस्था उभ्या केल्या. त्या संस्थांवर देशाची बांधणी झाली आहे.’
‘नेहरूमुक्त भारत करण्यासाठी मोदी सरकारने नियोजन आयोग बरखास्त केला. इराण आणि इस्रायल युद्धात पाकिस्तान मध्यस्थी करतो आणि आपण अगतिकपणे पाहत बसतो, हे भूषणावह नाही,’ अशी टीका मुणगेकर यांनी केली.

सावंत म्हणाले, ‘मागच्या पिढीने लोहियावादी होऊन चूक केली, तशी आजची पिढी समाजमाध्यमातून नेहरूंबद्दल तीच चूक करीत आहे. नेहरूंनी संसदेची प्रतिष्ठा जपली. सध्याच्या पिढीला नेहरू समजून सांगितले पाहिजेत. कट्टर हिंदू अशी जगात आपली ओळख होणे परवडणारे नाही. जगातील आपली ओळख बदलत असून, भारतीयांकडे संशयाने बघितले जात आहे.’

अन्वर राजन यांनी प्रास्ताविक केले. सूरज कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. तेजस भालेराव यांनी आभार मानले.