डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा तपास न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपविलेल्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. मात्र, तपास कोणत्याही यंत्रणेकडे गेला, तरी या गुन्ह्य़ातील मारेकरी आणि खरे सूत्रधार सापडणे आवश्यक आहे. हा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, अशी अपेक्षा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे चिरंजीव डॉ. हमीद यांनी व्यक्त केली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) कडे देण्याचा निर्णय घेतल्यानंतर  डॉ. हमीद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, की हा तपास सीबीआयकडे गेला असला, तरी त्यांनी स्थानिक यंत्रणांचे सहकार्य घ्यावे. या तपासाचे हस्तांतर करण्यास वेळ जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी. नऊ महिने झाले तरी खरे मारेकरी सापडले नसल्यामुळे हे पुणे पोलिसांचे अपयश आहे. मात्र, स्थानिक यंत्रणांनी यापुढेही सीबीआयला तपासात सहकार्य करावे. अंनिसचे कार्यकर्ते, कुटुंबीय यांच्याशी बोलून याबाबतची पुढची दिशा ठरविण्यात येईल. त्याचबरोबर सीबीआयनेही तपासाबाबत कुटुंबीयांशी संवाद ठेवावा, अशी अपेक्षा डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पुण्याचे पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी याबाबत सांगितले, की हा उच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे या निर्णयावर काहीच बोलणार नाही. आतापर्यंत या गुन्ह्य़ाच्या तपासासाठी पुणे पोलिसांकडून सर्व प्रयत्न करण्यात आले आहेत.