पुणे : ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय कितीही प्रगत झाला, तरी ‘सदाशिवपेठी मेंदू’च्या पुढे त्याची मजल जाणार नाही,’ असा मिश्कील टोला विख्यात माहिती तंत्रज्ञान अभ्यासक डॉ. दीपक शिकरपुर यांनी आज पुण्यात लगावला. पुणेरी पाहुणचाराचा पेच ‘एआयला’ही सुटत नसल्याचा किस्सा त्यांनी या कार्यक्रमात सांगितला. त्यानंतर उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
‘पुणेरी संस्कार, पाहुणचार आणि ‘तुम्ही की आम्ही?’ या पुणेरी प्रश्नाची गंमत सांगताना ‘चॅट जीपीटी’ आणि ‘जेमिनी’लाही काही प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत,’ असेही शिकरपुर सांगितले. पुण्यात ‘गोष्ट आहे पृथ्वी मोलाची’ या दीप्ती चंद्रचूड यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन दीपक शिकारपूर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता विषयीच्या अनेक गमतीजमती उलगडून सांगताना येणाऱ्या काळात यायला पर्याय नाही असेही नमूद केले.
‘तुम्ही की आम्ही?’; पुणेरी पाहुणचाराचा पेच ‘एआयला’ही सुटेना’
पुणेरी आणि सोलापुरी संस्कारांमधील फरक सांगताना डॉ. दीपक शिकरपुर यांनी ‘तुम्ही आम्हाला जेवायला बोलवणार की आम्ही तुम्हाला?’ हा साधा वाटणारा प्रश्न एआयला विचारल्याचा किस्सा सांगितला. चॅट जीपीटी आणि जेमिनीला हा प्रश्न विचारल्यानंतरही त्यांना नेमके उत्तर देता आले नाही. अखेर ‘तुम्हीच सांगा’ असे उत्तर मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात मात्र अशा प्रश्नाचे उत्तर कायम ‘तुम्ही’ असते,’ असे सांगत त्यांनी पुणेरी स्वभावाची खासियत उलगडली.
एआय थापा पण मारतो; वापरताना सजग राहा
‘‘एआय’ वापरा; मात्र तो वापरताना सजग राहा. कारण एआय अतिशय आत्मविश्वासाने थापा मारतो,’ असा इशारा माहिती-तंत्रज्ञान अभ्यासक डॉ. दीपक शिकारपूर यांनी दिला. अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये ‘एआय’च्या माध्यमातून शिक्षण घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांना तज्ज्ञांशी चर्चा आणि उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव दिला जात असल्याचे उदाहरण त्यांनी दिले.
‘आपल्याकडील ‘फ्रेशर’ला अनेकदा काहीच येत नसते; तरीही त्याची अपेक्षा कंपनीनेच शिकवावे आणि पगारही द्यावा, अशी असते. हा दृष्टिकोन बदलून विद्यार्थ्यांनी दीर्घकालीन करिअरचा विचार करायला हवा,’ असे शिकारपूर म्हणाले. ‘बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात केवळ पदव्या घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक आणि उद्योगाभिमुख शिक्षण घेणे गरजेचे आहे. कौशल्य आणि गुणवत्तेच्या जोरावरच भविष्यात रोजगाराच्या संधी मिळतील,’ असेही त्यांनी सांगितले.
