scorecardresearch

पुणे : राजकीय वक्तव्ये करण्याचे काम राजकारण्यांनी करावे ; अभिनेत्री विद्या बालन यांचे मत

महिला केंद्री चित्रपट मोठ्या पडद्यावर चालतील की नाही, याबाबत अजूनही निर्माते साशंक असतात.

पुणे : राजकीय वक्तव्ये करण्याचे काम राजकारण्यांनी करावे ; अभिनेत्री विद्या बालन यांचे मत
अभिनेत्री विद्या बालन (Source: Vidya Balan/Instagram)

एखाद्या राजकीय परिस्थितीबाबत मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती का बोलत नाही, असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. पण कलाकारांनी राजकीय वक्तव्ये का करावी? चित्रपट, कलाकार हे तुमचे मनोरंजन करण्यासाठी आहेत, राजकीय वक्तव्ये करण्याचे काम राजकारण्यांनी करावे, असे ठाम मत अभिनेत्री विद्या बालन यांनी बुधवारी मांडले.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य शासनातर्फे आयोजित २१ व्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘चॅलेंजेस ऑफ फिमेल ॲक्टर्स इन दी एंटरटेन्मेंट वर्ल्ड’ या विषयावर महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी बालन यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या मुलाखतीमध्ये त्यांनी चित्रपट क्षेत्रातील वाटचाल, विविध भूमिकांमागील किस्से, महिला केंद्री चित्रपट आणि त्यांच्यासमोरील आव्हाने अशा विषयांवर भाष्य केले.

हेही वाचा >>> जेव्हा अमिताभ बच्चन यांच्या पॅन्टमध्ये शिरतो उंदीर; पोस्ट शेअर करत महानायकाने सांगितला किस्सा

महिला केंद्री चित्रपट मोठ्या पडद्यावर चालतील की नाही, याबाबत अजूनही निर्माते साशंक असतात. अशावेळी तो चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करणे हा त्यांना अधिक सुरक्षित पर्याय वाटतो. त्यामुळेच महिला केंद्री चित्रपट हे ओटीटीवर प्रदर्शित करण्यावर अधिक प्राधान्य दिले जात आहे. महिला कलाकारांसाठी आता चित्रपटात खूप चांगल्या भूमिका लिहिल्या जात आहेत. चित्रपटात नायकाची भूमिका आता खूप साचेबद्ध झाली आहे. ते एकतर नायक असतात अथवा एखाद्या घटनेचे बळी असतात. त्या उलट महिला कलाकारांच्या भूमिकेत बरेच वैविध्य असते. लोकांनाही अशा प्रकारचा आशय पाहायला आवडतो. त्यामुळे महिला केंद्रित चित्रपट लिहिण्याचे प्रमाण आता वाढले आहे, असे बालन यांनी सांगितले.  बालन म्हणाल्या, की मी आठ वर्षांची असताना माधुरी दीक्षित यांचे एक दोन तीन हे गाणे पाहून त्यांच्यासारखे होण्याची इच्छा झाली आणि मी अभिनय क्षेत्रात जायचे ठरवले. अभिनेते मोहनलाल यांच्यासोबत चक्रम या मल्याळम चित्रपटासाठी माझी निवड झाली होती. मात्र तो चित्रपट रद्द झाला. त्यानंतर तीन वर्षांत तब्बल बारा मल्याळम चित्रपटातून मला काढून टाकण्यात आले. तो अतिशय संघर्षाचा काळ होता. पुढे युफोरिया म्युझिक व्हिडिओने चित्र बदलले. पुढे मला परिणीता, इश्किया, कहानी, डर्टी पिक्चर असे अनेक चांगले चित्रपट मिळाले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 22:30 IST