डॉ. जयंत नारळीकर इंग्लंडमधून भारतात परतल्यानंतर त्यांच्या व्याख्यानांना कशी गर्दी होत असे, याचे काही किस्से त्यांनी ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे यांना दिलेल्या आणि काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या मुलाखतीत सांगितले होते.
दिल्लीतील व्याख्यान
डॉ. जयंत नारळीकर यांचे दिल्लीत व्याख्यान होते. त्या व्याख्यानाचे अध्यक्ष होते ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ सी. डी. देशमुख. त्या व्याख्यानावेळी इतकी गर्दी झाली, की अनेक लोकांना बसायला जागा मिळाली नाही. त्यात इंदिरा गांधीही होत्या. त्यांनाही अखेर सभागृहाच्या विंगेतील खुर्चीत बसून व्याख्यान ऐकावे लागले.
मुंबईतील अध्यक्ष
मुंबईतील एका व्याख्यानावेळी त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे गृहस्थ मंचापर्यंत पोहोचूच शकले नाहीत. कारण, ते सभागृहापर्यंत पोहोचले, पण इतकी प्रचंड गर्दी झाली होती, की त्यांना आत शिरून मंचापर्यंत येताच आले नाही. त्यामुळे आयत्या वेळी अध्यक्ष बदलावे लागले.
सभागृहात बदल
व्याख्यानाच्या गर्दीचा एक प्रसंग तत्कालीन मद्रासमध्ये मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटच्या तत्कालीन प्रमुखांनी डॉ. नारळीकर यांना सांगितला होता. ते म्हणाले, एका खोलीत तुमचे व्याख्यान ठेवले होते, पण काही लोक व्याख्यानाची जागा पाहण्यासाठी म्हणून आले आणि त्या लोकांनी सांगितले, की इतक्या लहान जागेत व्याख्यान आयोजित करायचे तुमचे धाडस कसे झाले? त्यानंतर व्याख्यानाची जागा बदलावी लागली.