हरी नारायण आपटे आणि नाथ माधव यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या… शिवाजीमहाराजांवरील चित्रपट पाहून दहाव्या वर्षी लिहिलेल्या इंग्लिश परीक्षणाचे भालजी पेंढारकर यांनी केलेले कौतुक.. आचार्य अत्रे, चिं. वि. जोशी आणि पु. ल. देशपांडे यांच्या विनोदी साहित्यवाचनाची लागलेली गोडी.. अशा आठवणींना उजाळा देत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी रविवारी अनोखी मैफल रंगविली. मराठी भाषा टिकविण्याची मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी साहित्यिक आणि वैज्ञानिकांची आहे, असेही त्यांनी सांगितले.
मृत्युंजय प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते डॉ. नारळीकर यांना ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत साहित्य पुरस्कार आणि कोल्हापूर येथील स्वयंसिद्धा संस्थेच्या संचालिका कांचन परुळेकर यांना समाजकार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा मृणालिनी सावंत, कार्यकारी विश्वस्त सागर देशपांडे, कोशाध्यक्ष अमिताभ सावंत व्यासपीठावर होते.
‘झपाटलेले लेखक’ अशा शब्दांत शिवाजी सावंत यांचा गौरव करून नारळीकर म्हणाले, ‘मृत्युंजय’सारखे साहित्य येत राहिले, तर मराठी भाषा टिकेल का ही काळजी करण्याचे कारण नाही. विज्ञानातील सगळेच शोध आपल्यासाठी हितावह नसतात. त्यामुळे माणसाच्या हिताचे असलेल्या संशोधनाची माहिती सोप्या मराठीमध्ये पोहोचविण्याची जबाबदारी वैज्ञानिकांची आहे. अति माहिती देण्यामुळेही प्रदूषण होऊ नये याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मातृभाषेतून शिक्षण दिले तरच मुले प्रगती करू शकतात.
परुळेकर म्हणाल्या, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ६६ वर्षांत ५० टक्के महिलांकडे लक्ष दिले गेले नाही. एकाच पायावर चालत भारत महासत्ता होण्याचा ध्यास घेत आहे. केवळ जेंडर बजेट करून महिला सक्षम होणार नाहीत. ज्ञानाला कृतीची जोड दिल्याखेरीज समाजामध्ये बदल होणार नाहीत. हा पुरस्कार संस्थेतील महिलांच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे.
मंत्र्यांची भाषणे ऐकल्यावर आमचा विनोद मरेल असे वाटत नाही, अशी टिप्पणी पुरंदरे यांनी आपल्या भाषणात केली. देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. अमिताभ सावंत यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr jayant narlikar honoured by mrityunjay award
First published on: 30-09-2013 at 02:56 IST