पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी डॉ. के. व्यंकटेशम

पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची बदली अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) म्हणून नियुक्ती करण्यात आली.

आर. के. पद्मनाभन व डॉ. के. व्यंकटेशम

* आर. के. पद्मनाभन पिंपरीचे पहिले पोलीस आयुक्त * ’ रश्मी शुक्ला यांची अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

पुणे : पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची सोमवारी बदली करण्याचे आदेश सोमवारी गृहविभागाने दिले. पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी डॉ. के. व्यंकटेशम यांची नेमणूक करण्याचे आदेश देण्यात आले. पिंपरीचे पहिले पोलीस आयुक्त होण्याचा मान आर. के. पद्मनाभन यांना मिळाला आहे. दरम्यान, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) प्रमुखपदी संजीव सिंघल यांची नेमणूक करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या होत्या. पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी कार्यकाळ पूर्ण केला होता. त्यांच्या जागी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे निश्चित होते. मात्र, गृहविभागाकडून याबाबत अधिकृत आदेश देण्यात आला नव्हता. गृहविभागाने राज्यातील अकरा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश सोमवारी दुपारी दिले. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची बदली अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) म्हणून नियुक्ती करण्यात आली. अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) आर. के. पद्मनाभन यांची पिंपरीच्या पोलीस आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली.

दरम्यान, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख संजय कुमार यांची नवी मुंबईत पोलीस आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली. राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील अतिरिक्त पोलीस महासंचालक संजीव सिंघल यांची सीआयडीच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली. राज्य कारागृह विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची नागपूर पोलीस आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली.

पिंपरीतील गुन्हेगारीचा बीमोड करण्याचे आव्हान

पिंपरी पोलीस आयुक्तालयाची घोषणा झाली असून येत्या पंधरा ऑगस्ट रोजी ते कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. पिंपरीच्या पहिल्या पोलीस आयुक्तपदाचा मान आर. के. पद्मनाभन यांना मिळाला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे यांची शुक्रवारी नेमणूक करण्यात आली. पद्मनाभन आणि रानडे हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. उद्योगनगरीतील गुंडगिरीचा बीमोड करण्यासाठी नवनियुक्त पोलीस आयुक्तांना राजकीय दबाव झुगारून कठोर कारवाई करावी लागणार आहे.

पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. विकसित आणि सांस्कृतिकदृष्टय़ा पुढारलेल्या शहरातील आव्हाने वेगळी असतात. माझा आजवरचा अनुभव आणि पुण्यातील समस्या विचारात घेऊन नवीन योजना राबविण्यात येईल. नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे सहकार्य घेण्यात येईल. कायदा-सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देऊ न गुंडगिरीला आळा घालण्यात येईल.

– डॉ. के. वेंकटेशम, पोलीस आयुक्त, नागपूर

शहरातील कायदा-सुव्यवस्था सांभाळण्यात पुणेकरांनी मला सहकार्य केले. माझ्या आयुष्यातील दु:खद घटनांमध्ये पुणेकर माझ्या पाठिशी उभे राहिले. ज्येष्ठ नागरिक कक्ष, महिला सुरक्षिततेसंदर्भात विविध उपक्रम राबविण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आला. पुण्यातील कार्यकाळ उत्तम पार पडला. पुणेकरांचे मी मन:पूर्वक आभार मानते.

– रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त, पुणे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dr k venkatesham is new pune police commissioner