पुणे : लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचा विचार मांडणारे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी मध्यरात्री पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. गाडगीळ यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन्यजीवविषयक धोरणांच्या निर्मिती मंडळ, समिती आणि संशोधन संस्थांमधील वरिष्ठ पदांच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या. पंतप्रधानांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार मंडळाचे ते चार वर्षे सदस्य होते. डॉ. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या पश्चिम घाट जैवविविधता तज्ज्ञ समितीमार्फत पहिल्यांदा व्यापक स्तरावर पश्चिम घाटातील निसर्गसंपदेचे दस्तऐवजीकरण झाले. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. धनंजयराव गाडगीळ यांचे माधव गाडगीळ हे पुत्र होत. माधव गाडगीळ यांचा जन्म पुण्यात झाला. शालेय शिक्षण त्यांनी पुण्यात घेतले. वडील ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे’ आजीव सदस्य होते. सलीम अलींसारखे ख्यातनाम पक्षितज्ज्ञ त्यांचे मित्र होते. वडील आणि सलीम अली यांच्याबरोबर फिरताना, गाडगीळ यांना जैवविविधता, पर्यावरण, जीवशास्त्रामध्ये आवड निर्माण झाली. फर्ग्युसन महाविद्यालयातून प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले.

इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स,मुंबई येथून सागरी जीवविज्ञानातील पदव्युत्तर पदवी संपादन केल्यावर पीएच. डी. अभ्यासासाठी ते अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात गेले. जीवशास्त्र विषयात गणितीय प्रतिमानांचा आधार असणारा प्रबंध सादर करणारे गाडगीळ हे हार्वर्डमधील पहिलेच विद्यार्थी होते. विल्यम बॉसर्ट यांच्या मार्गदर्शनाखाली माशांच्या वर्तनाबद्दल जीवविज्ञानातील पीएच. डी. संपादन केल्यानंतर काही वर्षे त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात जीवशास्त्र, स्टॅन्फर्ड विद्यापीठात मानवी जीवशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कली विद्यापीठातही त्यांनी व्याख्याने दिली. पुढे भारतात परतल्यावर त्यांनी पुण्यात ‘महाराष्ट्र असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’मध्ये (आता आघारकर संशोधन संस्था) वैज्ञानिक अधिकारी म्हणून काम पाहिले. १९७३ ते २००४ दरम्यान ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ बंगळुरू हे त्यांनी आपल्या कामाचे केंद्र ठेवले. सहायक, सहयोगी प्राध्यापक, नंतर प्राध्यापक आणि शेवटी त्यांनी तेथेच ‘सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस’ ही संस्था स्थापन केली व तिचे ते अध्यक्ष होते.

माणूस हा देखील जैवविविधतेतील एकात्म पर्यावरणीय घटक आहे. तो पर्यावरणातून वगळून चालणार नाही, अशी विचारसरणी गाडगीळ यांनी मांडली.

गाडगीळ केंद्र शासनाच्या स्वतंत्र पर्यावरण विभाग स्थापन करण्यासाठीच्या समितीचे सदस्य होते. त्यांनी त्याचा आराखडा बनवून स्वतंत्र पर्यावरण विभाग साकारला. जीवावरण संवर्धनासाठी ‘नीलगिरी’ टेकड्या संरक्षित क्षेत्रासाठीचा प्रकल्प आराखडा गाडगीळ यांनी तयार केला. भारतातील हा पहिलाच प्रयत्न होता. १९८६ ते १९९० या काळात ते भारताच्या पंतप्रधानांच्या विज्ञान तंत्रज्ञान सल्लागार मंडळाचे सदस्य होते. जैवविविधता परिषदेच्या सल्लागार समितीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.

पंतप्रधानांच्या पुढाकाराने वाघांचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या हेतूने स्थापलेल्या विशेष कार्यगटाच्या पाच निष्णात सदस्यांपैकी ते एक होते. गाडगीळ यांनी जीवशास्त्र, परिस्थितीकी, उत्क्रांतिशास्त्र अशा क्षेत्रांतील अभ्यासकांसाठी सव्वादोनशेहून अधिक शोधनिबंध लिहिले आहेत. सहा इंग्रजी पुस्तकांचे ते लेखक आहेत. उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन गाडगीळ यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार, सन्मानांनी गौरविण्यात आले. अलीकडेच सदर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीने गाडगीळ यांना पर्यावरणशास्त्रातील कामगिरीसाठी टायलर पुरस्कार प्रदान केला होता.