पुणे : ‘आपला देश प्राचीन काळापासून उद्योगप्रधान होता. कापड, धातू आणि रसायन अशा विविध क्षेत्रांत भारताचे जागतिक बाजारपेठेत प्रभुत्व होते. एका देशाला दोन नावे असणे हे जगाच्या पाठीवर कुठेही नाही. पण, ‘इंडिया’ नव्हे तर ‘भारत’ हीच आपली खरी आणि गौरवशाली ओळख आहे. याच ‘स्व-बोधा’तून आणि सेवाभावातून भारत आगामी काळात जगाचा दीपस्तंभ बनेल,’ असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य डॉ. मनमोहन वैद्य यांनी रविवारी व्यक्त केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त पर्वती भागाच्या वतीने आयोजित ‘संघ शताब्दी मंथन’ कार्यक्रमाचे उद्घाटन निदा शेख व ज्योति वाघमारे-शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी वैद्य बोलत होते. करिअर समुपदेशक संजय कुलकर्णी, पर्वती भाग संघचालक ॲड. चंद्रशेखर कुलकर्णी आणि संयोजक शिरीष आपटे या वेळी उपस्थित होते.

वैद्य म्हणाले, ‘भारताचे औद्योगिक वैभव किती मोठे होते, याचा उल्लेख डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सोमनाथ मंदिर उद्घाटनावेळी केला होता. आपली संस्कृती एक असली, तरी उत्सव विविध आहेत. करोनाच्या संकटकाळात संपूर्ण जगाने भारताची आध्यात्मिक शक्ती अनुभवली. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सर्वसामान्य नागरिक सेवाकार्यासाठी ज्या पद्धतीने बाहेर पडले, ते राष्ट्र जिवंत असल्याचे जिवंत उदाहरण आहे.’

‘विविधता असली, तरी सर्व समाज एक आहे. आपल्या प्रतिज्ञेमध्ये ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत,’ असे आहे. भारत माझा देश असेल तर, त्याला ठीक करण्यासाठी मलाच योगदान दिले पाहिजे, हे प्रत्येकाने ध्यानात घेतले पाहिजे. अडचणी येतील. पण, काम करत राहण्यातून एक चांगला भारत घडताना दिसेल, ज्याची सारे जग वाट पाहात आहे. ‘मी’पेक्षा ‘आम्ही’ या एकजुटीतून कलेचा आविष्कार घडविणे शक्य आहे. कलेतून सामाजिक संदेश देता येतो. अधिकाधिक लोकांना बरोबर घेऊन चालत राहायचे आहे,’ याकडे वैद्य यांनी लक्ष वेधले.

संजय कुलकर्णी म्हणाले, ‘पाश्चात्य देशांमध्ये कुटुंब व्यवस्था कोलमडली आहे. कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमध्येही ही व्यवस्था संपवण्याचे भाष्य केले गेले होते, मात्र, भारताने आपली कौटुंबिक मूल्ये जपणे ही काळाची गरज आहे. आपल्याकडे झाडूलाही नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्याची उदात्त संस्कृती आहे.’ पर्यावरण रक्षणासाठी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हा मंत्र जपत पाणी वाचवणे, व प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन कुलकर्णी यांनी केले. तसेच, सामाजिक समरसता वाढवण्यासाठी घरेलू कामगारांना सन्मानाची वागणूक देणे आणि सामाजिक नीतिमत्तेचा भाग म्हणून वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.