पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे याला जामीन मंजूर केला असून, त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची भूमिका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) मंगळवारी पत्रकार परिषदेत मांडली.
‘आमचा न्यायव्यवस्थेवर अजूनही विश्वास आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर, त्याचा अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत,’ असे ‘अंनिस’च्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य मिलिंद देशमुख, ॲड. श्रीपाल ललवाणी आणि नंदिनी जाधव यांनी सांगितले. संघटनेचे कार्यकर्ते दत्तात्रय जाधव, नागेश कवडे या वेळी उपस्थित होते.
‘यापू्र्वी दाभोलकर हत्या प्रकरणातील तीन आरोपींची सबळ पुराव्यांअभावी मुक्तता करण्यात आली आहे. त्याविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याला मिळालेल्या जामिनाविरोधातही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार असून, त्यासाठी ‘अंनिस’कडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आता मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीला जामीन दिला आहे. या निर्णयाची प्रत मिळताच, त्याचा अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत,’असे देशमुख यांनी सांगितले.
डॉ. दाभोलकरांच्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यात विविध उपक्रमांचे आयोजन
– गुरुवारी (२० ऑगस्ट) सकाळी ११ वाजता महर्षी वि. रा. शिंदे पुलावर गाणी आणि घोषणांच्या माध्यमातून डॉ. दाभोलकरांना अभिवादन करण्यात येणार आहे. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद गुप्ता यांच्या हस्ते महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (एमकेसीएल) व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक सावंत लिखित ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या पुस्तिकेचे लोकार्पण होणार आहे.
– गुरुवारी सायंकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत एस. एम. जोशी सभागृहात ‘मानियेले नाही बहुमता’ या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. प्रज्ञा दया पवार, सोनाली कुलकर्णी, पर्ण पेठे, केतकी थत्ते आणि प्रदीप कोकरे हे कलाकार सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाची संरचना अक्षय शिंपी आणि मुकुंद कुळे यांनी केली आहे.
– शुक्रवारी (२१ ऑगस्ट) सकाळी १० वाजता मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालयाच्या सभागृहात प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्या हस्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्यावरील चरित्रपुस्तिकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
– शनिवारी (२२ ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजता राष्ट्र सेवा दलाच्या निळू फुले सभागृहात ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती व्याख्यान’ आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. प्रशांत भूषण मार्गदर्शन करणार आहेत. तसेच डॉ. दाभोलकरांच्या १० पुस्तकांच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशनही या वेळी करण्यात येणार आहे.
