scorecardresearch

डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांची साक्षीदाराकडून ओळख

खटल्यात पुणे महापालिकेच्या सफाई विभागातील कर्मचाऱ्याची साक्ष शनिवारी नोंदविण्यात आली. ही साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरणार आहे

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील अग्रणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळीबार करणारे आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने शनिवारी न्यायालयात ओळखले. अंदुरे आणि कळसकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केला आणि ते दोघे तेथून पळाले, अशी साक्ष साक्षीदाराने दिली.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात ‘सनातन’ संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे, सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. या खटल्यात पुणे महापालिकेतील सफाई विभागातील कर्मचाऱ्याची साक्ष शनिवारी नोंदवण्यात आली. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू आहे.

या खटल्यात पुणे महापालिकेच्या सफाई विभागातील कर्मचाऱ्याची साक्ष शनिवारी नोंदविण्यात आली. ही साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरणार आहे. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) बाजू मांडली. शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. दाभोलकर यांची सकाळी हत्या करण्यात आली. घटनास्थळापासून काही अंतरावर एक सफाई कामगार आणि त्याची सहकारी महिला सफाई करत होते. काम आटोपल्यानंतर ते पुलाजवळच्या दुभाजकावर बसले होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळय़ा झाडल्या आणि ते तेथून पसार झाले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तेथे गेले, तेव्हा डॉ. दाभोलकर रक्ताच्या थारोळय़ात पडले होते, असे अ‍ॅड. सूर्यवंशी यांनी न्यायालयात सांगितले. डॉ. दाभोलकर कुटुंबीयांच्या वतीने या खटल्यात अ‍ॅड. ओंकार नेवगी काम पाहत आहेत. या खटल्याची सुनावणी २३ मार्च रोजी होणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dr narendra dabholkar witness identification of the killers akp

ताज्या बातम्या