पुणे : ‘पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी,’ अशी मागणी विधान परिषदेचे उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केली. वैष्णवीने वैवाहिक आणि कौटुंबिक अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, ही घटना अत्यंत वेदनादायी आणि अमानुष असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
डाॅ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आवश्यक पुरावे उपलब्ध झाले आहेत. वैष्णवीचा मृत्यू हा सामाजिक आणि कौटुंबिक दबावाचा परिणाम असून, ती एका अन्यायकारक व्यवस्थेची बळी ठरली आहे.’
डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. ‘महिन्याला दीड हजार रुपये देणे हीच जबाबदारी नाही, तर प्रत्येक बहिणीच्या पाठीशी भाऊ म्हणून उभा आहे. कोणत्याही महिलेला कौटुंबिक छळाचा सामना करावा लागत असेल, तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा,’ असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याचे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.