पुणे : विधान परिषदेच्या सदस्या डाॅ. नीलम गोऱ्हे यांच्या शिवाजीनगर भागातील निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला.
डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, ‘निवासस्थानातील पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर सुरक्षारक्षक पाण्याच्या टाकीची पाहणी करण्यासाठी गच्चीवर गेला. तेव्हा नळजोड तोडल्याचे दिसून आले. सीसीटीव्ही चित्रीकरणात तरुण पहाटे तीनच्या सुमारास गच्चीवर गेल्याचे दिसले. सकाळपर्यंत तो तेथे होता.तो विद्यार्थी असल्याची कागदपत्रे सापडली आहे. मात्र, तो एवढा वेळ बंगल्याच्या आवारात का थांबला, यादृष्टीने तपास होणे गरजेचे आहे. संबंधित तरुणाला सोडविण्यासाठी काही जणांनी पोलिसांना दूरध्वनी केल्याची चर्चा आहे. या बाबत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी या बाबत चर्चा केली. या घटनेमागे राजकीय हेतू आहे का, ही बाब तपासातून स्पष्ट होईल. यापूर्वी निवासस्थानाच्या परिसरात दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली होती, तसेच धमकीही देण्यात आली होती. निवासस्थान परिसराची सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी पुन्हा पाहणी करावी.’
डाॅ. गाेऱ्हे यांचे शिवाजीनगर भागातील माॅडेल काॅलनीत निवासस्थान आहे. शनिवारी (२६ सप्टेंबर) सकाळी सव्वासहाच्या सुमारास एक तरुण बंगल्यात शिरला. डाॅ. गोऱ्हे यांच्या निवासस्थानाच्या परिसरात बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचारी आणि सुरक्षारक्षकाने त्याला पकडले. त्याच्याकडील पिशवीत हातोडा, पक्कड, हातमाेजे, दहा मीटर लांबीची दोरी सापडली. निवासस्थानात प्रवेश केल्यानंतर त्याने पाण्याच्या टाकीतील नळजोड बंद केला होता.
घटनेच्या वेळी डाॅ. नीलम गोऱ्हे निवासस्थानी नव्हत्या. आरोपी तरुणाकडे सापडलेल्या साहित्याबाबत तपास होणार आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून, सखोल तपास करण्यात येत आहे. – अमितेशकुमार, पोलीस आयुक्त
