पुणे : ‘स्वातंत्र्योत्तर काळातील सुशिक्षित, स्वावलंबी अशा नवीन स्त्री प्रतिमेचे दर्शन इंदिरा संत यांच्या कवितेने घडविले. कवितेतून त्यांनी एका सांस्कृतिक अवकाशाची कलात्मक निर्मिती केली. त्यांची कविता केवळ खासगी सुख-दुःख व्यक्त करणारी नव्हती. त्यातून तत्कालीन मध्यमवर्गीय स्त्रीचा अंतःस्वर प्रकट झाला,’ असे मत साहित्याच्या अभ्यासक आणि ज्येष्ठ कवयित्री डॉ. नीलिमा गुंडी यांनी मंगळवारी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित राजेंद्र बनहट्टी व्याख्यानमालेत ‘कवयित्री इंदिरा संत आणि त्यांच्या वारसदार’ या विषयावर नीलिमा गुंडी यांचे व्याख्यान झाले. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.
गुंडी म्हणाल्या, ‘स्त्रीकेंद्री कविता आणि स्त्रीवादी कविता हे दोन प्रवाह वेगळे असले, तरी त्यामागे स्त्री मनाचा थांग लावण्याची धडपड ही एकाच कोंबातून निघाली आहे. अशी कविता जाणून घेण्यासाठी वाचकाचीही भाषेवर पकड असावी लागते. इंदिरा संत यांच्या काव्य क्षेत्रातील सांस्कृतिक वारसदार म्हणून आजच्या अनेक कवयित्रींचा उल्लेख करता येईल. स्त्रीत्वाचा शोध, अभिव्यक्त होण्याची उत्कट ओढ, समकालीन स्त्री वर्गाशी सहसंवेदन आणि आत्मभान ही त्यांच्या कवितेची घटकद्रव्ये प्रभा गणोरकर, उषा मेहता, रजनी परुळेकर, अरुणा ढेरे, अनुराधा पाटील, मलिका अमरशेख, अश्विनी धोंगडे, कविता महाजन, नीरजा, प्रज्ञा पवार या कवयित्रींमध्ये दिसून येतात.’
‘इंदिरा संत यांची कविता समाजविन्मुख असली, तरी तिने आपल्या पद्धतीने स्वतःची वाट शोधली’, असे जोशी यांनी सांगितले.