पुणे : ‘नाणकशास्त्राच्या अभ्यासाला बनावट नाणीनिर्मितीचा मोठा धोका पोहोचतो,’ असे मत नाणकशास्त्राचे अभ्यासक डाॅ. पद्माकर प्रभुणे यांनी गुरुवारी व्यक्त केले. मध्यंतरीच्या कालखंडात छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा होन प्रसारित झाला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वतीने ग. ह. खरे स्मृतिदिनानिमित्त ‘भारत इतिहास संशोधक मंडळातील दुर्मीळ नाणी आणि ग. ह. खरे यांचे नाणकशास्त्रातील योगदान’ या विषयावर डाॅ. पद्माकर प्रभुणे यांचे व्याख्यान झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

‘दक्षिणच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने’ या ग. ह. खरे आणि मो. गं. दीक्षित यांनी संपादित केलेल्या ग्रंथाचे पुन:प्रकाशन करण्यात आले. मंडळाचे खजिनदार नंदकुमार निकम यांच्या हस्ते नाणकशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. मोडी अभ्यासक संदीप तिखे आणि दुर्ग अभ्यासक सचिन जोशी या वेळी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकप्रसंगी पाडलेली तांब्याची शिवराई, अर्ध्या पैशाची शिवराई, पेशवेकालीन नाणी, ईस्ट इंडिया कंपनीचे नाणे, टिपू सुलतानाच्या नाण्यांवरील कालगणना, यादवकालीन पद्मटंकावरील चक्रव्यूहाचे चिन्ह अशा मंडळाच्या संग्रहातील विविध नाण्यांची माहिती देऊन प्रभुणे म्हणाले, ‘खरे यांनी १९३३ मध्ये ‘मंडळातील नाणी’ हे नाण्यांवरील पुस्तक प्रकाशित केले होते. या पुस्तकाचे लेखन, संशोधनपर लेख, नाणकशास्त्र अभ्यासातील नव्या शब्दांची निर्मिती आणि या शास्त्राचा आंतरविद्याशाखीय अभ्यास असे खरे यांनी चौफेर योगदान दिले.’

‘पदवीधर नसतानाही खरे हे तत्कालीन पुणे विद्यापीठामध्ये पीएचडीचे मार्गदर्शक होते,’ असे निकम यांनी मनोगतामध्ये सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाण्यांचे मूल्य कसे ठरविणार हा प्रश्नच आहे. त्यामुळे नाण्यांच्या खरेदीचे व्यवहार गोंधळाचे ठरू शकतात. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मान्यतेशिवाय भारतातील नाणे परदेशात जाऊ शकत नाही. – डाॅ. पद्माकर प्रभुणे, नाणकशास्त्राचे अभ्यासक