पिंपरी महापालिकेतील विद्युत विभागात गेल्या अनेक वर्षांपासून मोकाट सुटलेल्या व टक्केवारीच्या पैशाला ‘पंचामृत’ संबोधून बिनबोभाट कोटय़वधींची माया लाटणाऱ्या अधिकाऱ्यांचे रॅकेट मावळते आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी जाता-जाता उघड केले. सोमवारी कार्यकारी अभियंता मिलिंद कपिले व वासुदेव अवसरे यांना सेवानिलंबित करतानाच मुख्य विकास अभियंता अशोक सुरगुडे यांच्यासह १३ अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश त्यांनी दिले. या कारवाईमुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली असून योग्य पध्दतीने चौकशी झाल्यास अनेक बडय़ा धेंडांची नावे उजेडात येणार आहेत.
विकास अभियंता अशोक सुरगुडे, कार्यकारी अभियंता कैलास थोरात, संदेश चव्हाण, उपअभियंता माणिक चव्हाण, दिलीप धुमाळ, नितीन देशमुख, एकनाथ पाटील, कनिष्ठ अभियंता वासुदेव मांढरे, महेश कावळे, अकबर शेख, ए. एन. आडसुळे, प्रकाश कातोरे, दमयंती पवार यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाला शिवसेनेच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी वाचा फोडली. तर, दोषींवर कारवाईची मागणी विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनी केली होती. आयुक्तांनी याबाबतच्या तक्रारींची सखोल चौकशी केली. तेव्हा काही प्रकरणात प्रचंड काळेबेरे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वाकडच्या रस्त्यांवरील खांब व तारा काढून भूमिगत टाकण्याच्या १४ कोटी ३७ लाखाच्या कामात महापालिकेने फिनोलेक्स कंपनीच्या केबल पुरवल्या होत्या. काम संपताना उर्वरित केबल परत करतेवेळी त्या दुसऱ्या कंपनीच्या दिल्या. दोन्हीतील दर्जा व किंमतीत फरक असल्याने व पालिकेची फसवणूक झाल्याचे उघड झाले. मनपाभवन रस्तारूंदीकरणात अडथळा करणाऱ्या वीजवाहिन्या हलवण्याचे २ कोटीचे काम तब्बल सहापट म्हणजे १२ कोटींवर नेण्यात आले. तिसऱ्या प्रकरणात दिघी, बोपखेल व कासारवाडी कार्यक्षेत्रातील दोन कोटींच्या कामात अनियमितता दिसून आली. या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, हे स्पष्ट झाले होते. मात्र, त्यास मुहूर्त मिळत नव्हता. अखेर, शेवटच्या दिवशी आयुक्तांनी दोषी अधिकाऱ्यांना ‘शॉक’ दिल्याचे मानले जाते. या प्रकरणात राष्ट्रवादीचे दलाल नेते अडकले असून त्यांच्यासह अनेकांचे उद्योग यानिमित्ताने उघड होणार आहेत.