पुणे : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याप्रकरणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील (डीआरडीओ) संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप कुरुलकर याच्याविरुद्ध दाखल खटल्याची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात होणार आहे.

या प्रकरणात सत्र न्यायालयाने राज्य दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) सक्षम प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी हा आदेश दिला. त्यानुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यू. एस. एम. अल. अमुदी यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केलेे आहे. मंगळवारी (१७ मार्च) सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. कुरुलकर याच्या वतीने ॲड. ऋषीकेश गानू, ॲड. राघव पुराणिक यांनी या कार्यवाहीला आव्हान देणारा अर्ज न्यायालयात सादर केला.

‘गोपनीयता कायद्यामधील कलम १३ चे पालन न झाल्याने संपूर्ण कार्यवाहीत मूलभूत कायदेशीर त्रुटी आहेत. या कायद्यानुसार कार्यवाहीची सुरुवात दंडाधिकाऱ्यासमोर तक्रार दाखल करून होणे आवश्यक आहे. केवळ पोलीस अहवाल किंवा आरोपपत्राद्वारे नाही. या तरतुदीचे पालन न झाल्यास अटक, तसेच पुढील तपास आणि कार्यवाही बाधित ठरते’, असे ॲड. गानू आणि ॲड. पुराणिक यांनी युक्तिवादात न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत सरकार पक्षाला उत्तर सादर करण्यासाठी न्यायालयाने वेळ दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ मार्च रोजी होणार आहे.

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील एका महिलेने डाॅ. कुरुलकर याला माेहजालात ओढून गोपनीय माहिती मिळवली होती. या प्रकरणात कुरुलकर याला ‘एटीएस’ने ४ मे २०२३ रोजी अटक केली होती. कुरुलकर सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार काम पाहत आहेत.

अल्पवय़ीन मतिमंद मुलीवर अत्याचार करणारे अटकेत

अल्पवयीन मतिमंद मुलीवर ओळखीतील तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून तिघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १५ वर्षांची असून, ती मतिमंद आहे. जानेवारी महिन्यात सोसायटीत राहणाऱ्या तिघांनी तिला क्लब हाऊसच्या प्रसाधनगृहात नेले. तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर या मुलीवर सोसायटीच्या आवारात पुन्हा अत्याचार करण्यात आले.

मुलगी एकाशी मोबाइलवर बोलत असल्याचे वडिलांंच्या लक्षात आले. त्यानंतर वडिलांनी तिची चौकशी केली. चौकशीत मुलीवर ओळखीतील तिघांनी अत्याचार केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध बालकांचे लैगिंक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात तपास करत आहेत.