पुणे : दलित, विद्रोही आणि स्त्रीवादी साहित्य चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ लेखिका-कवयित्री डाॅ. प्रज्ञा दया पवार यांची लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचारवेध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पद्मपाणी फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ऑगस्ट रोजी हे संमेलन होणार आहे.
आयोजकांनी केलेल्या नम्र विनंतीला मान देऊन डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास आपला सहर्ष होकार दिला आहे, अशी माहिती संमेलनाचे संयोजन समिती अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर येथे सकाळी दहा वाजता होणाऱ्या या संमेलनातून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुरोगामी, विद्रोही आणि कष्टकरी जनतेच्या हक्कांच्या विचारांचा वेध घेणे हा मुख्य उद्देश आहे.
साठे यांचे ’जग बदल घालूनी घाव, सांगूनी गेले मज भीमराव’ हे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. डॉ. प्रज्ञा दया पवार यांचे मराठी साहित्य क्षेत्रातील योगदान आणि त्यांची सामाजिक जाणीव अत्यंत प्रगल्भ आहे. त्यांच्यासारख्या खंबीर आणि ज्येष्ठ विचारवंताचे नेतृत्व या संमेलनाला लाभल्यामुळे या वैचारिक सोहळ्याची उंची आणि समृद्धी अधिक वाढणार आहे, असे डंबाळे यांनी या पत्रकात नमूद केले आहे. या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजन समितीचे प्राज्ञ वैशाली देठे, डॉ. राहुल ससाणे, सतीश वाघमारे आणि संतोष मदने हे विशेष परिश्रम घेत आहेत.
संमेलनामध्ये विविध वैचारिक सत्रांचे, परिसंवादांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे शहर व महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते, साहित्यिक, अभ्यासक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व साहित्यप्रेमींनी आणि नागरिकांनी या संमेलनाला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पद्मपाणी फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कर्मचारी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
संमेलन अध्यक्षा डॉ. प्रज्ञा दया पवार यांचा परिचय
- मराठी साहित्यातील दलित, विद्रोही आणि स्त्रीवादी चळवळीत मोलाचे योगदान
- लेखनातून नेहमीच सामाजिक विषमता, शोषितांचे प्रश्न आणि स्त्रियांच्या हक्कांवर सडेतोड भाष्य
- ‘अंतस्थ’, ‘उत्कट शब्दवेध’, ’मी भिडवू इच्छितेय समोरासमोर डोळे’, ’आरपार’ यांसारखे काव्यसंग्रह
- ‘धादांत खैरलांजी’(दीर्घ कविता), ‘केंद्रांकित’ (ललित लेखसंग्रह), ‘मातीचा पोत’ यांसारख्या वैचारिक व ललित पुस्तकांची निर्मिती
- महाराष्ट्र शासनाच्या कवी केशवसुत पुरस्कारासह अनेक नामांकित राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित
- विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये साहित्याचा समावेश
- महाराष्ट्रातील पुरोगामी, आंबेडकरी आणि समतावादी चळवळींमध्ये डॉ. प्रज्ञा पवार यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे. चळवळीतील एक खंबीर आणि विवेकी आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
