Dr Prakash Amte discharged from hospital: प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांना रुग्णालयामधून घरी सोडण्यात आलं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना ८ जून रोजी पुण्यामधील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं. फेसबुकवरुन प्रकाश आमटे यांचे पुत्र अनिकेत आमटे यांनी ही महिती दिली आहे. ८ जून रोजी डॉ. आमटे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभासाठी आले असता त्यांना ताप आणि खोकला अशी लक्षणे आढळली. त्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. न्यूमोनियावर उपचार सुरु असताना केलेल्या काही चाचण्यांमधून डॉ. आमटे यांना प्राथमिक अवस्थेतील रक्ताचा कर्करोग (ल्यूकेमिया) असल्याचे निष्पन्न झाले. येथील उपचारानंतर डॉ. आमटे यांना घरी सोडण्यात आलं असून पुढील उपचार कसे असतील यासंदर्भातील माहिती अनिकेत यांनी डॉ. आमटेंच्या फेसबुक पेजवरुनच दिली आहे. "बाबांची तब्येत आज बरी आहे. आज सध्या पुरता डिस्चार्ज मिळाला आहे. दोन तीन दिवसांनी तपासणी (चेक अप) होईल. परत रक्ताच्या सर्व टेस्ट करतील आणि ब्लड व्हॅल्यूज ठीक असल्यास लवकरच (आठ ते दहा दिवसांत) केमोथेरपी सुरू करतील. पुढील साधारण महिनाभर ट्रीटमेंट पुण्यातच होणार आहे. बाबांचा आजचा फोटो सोबत जोडला आहे रुमानी सोबतचा. पेशंट कसा असावा याचे आयडीयल उदाहरण आहेत बाबा. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये अतिशय आपुलकीने ट्रीटमेंट करणारे डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, मामा मावश्या सर्वांचे आभार." असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आपण सर्वांच्या शुभेच्छा धीर द्यायला सोबत आहेतच, असं म्हणत अनिकेत आमटेंनी सर्व हितचिंतकांचे आभार मानले आहेत. याच पोस्टमध्ये पुढे अनिकेत आमटेंनी लोक बिरादरीमध्ये शिकणाऱ्या दहावीच्या मुलांचा निकालासंदर्भातील आकडेवारी दिलीय. सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पहिल्या पाच मुलांची नावं देतानाच एकूण निकाल ८३ टक्के लागल्याचंही त्यांनी सांगितलंय. "आनंदाची बातमी, लोक बिरादरी आश्रमशाळा मधून मार्च २०२२ ची दहावी पास झालेले प्रथम पाच विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत. १) प्रथम क्रमांक : - अनिकेत झुरू पुंगाटी, प्राप्त गुण ५०० पैकी ४०४ टक्केवारी ८०.८०% २) द्वितीय क्रमांक :-रोहित रमेश दुर्वा, प्राप्त गुण ५०० पैकी ३९९, टक्केवारी ७९.८० % ३) तृतीय क्रमांक: - महेश अमलू काळंगा, प्राप्त गुण ५०० पैकी ३९०, टक्केवारी ७८% ४) चतुर्थ क्रमांक :-कुमारी अरुणा प्रमोद परसा प्राप्त गुण ५०० पैकी ३७८, टक्केवारी ७५.६० % ५) पाचवा क्रमांक:- कुमारी साक्षी संजय वेलादी प्राप्त गुण ५०० पैकी ३६१, टक्केवारी ७२.२० % एकूण निकाल ८३ टक्के लागला आहे. कॉपी मुक्त निकाल आहे. त्यामुळे ज्यांनी अभ्यास केला ती पास झालीत. सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी निराश न होता चांगला अभ्यास करून पुढील परीक्षेत यश संपादन करावे या साठी शुभेच्छा," असं पोस्टमध्ये म्हटलंय. प्रकाश आमटेंना रुग्णालयामधून मिळालेली सुट्टी आणि लोक बिरादरीमधील दहावीच्या मुलांचा उत्तम निकाल या दोन्ही गोष्टींसाठी आमटे कुटुंबियांचे हितचिंतक त्यांना कमेंट्स सेक्शनमधून शुभेच्छा देताना दिसत आहेत. प्रकाश आमटे लवकरच ठणठणीत बरे होवोत असंही अनेकांनी कमेंट्समध्ये म्हटलंय.