पुणे : ‘सध्याच्या महाराष्ट्रामध्ये काही सामाजिक वैगुण्ये निर्माण झाली आहेत. त्यांपैकी दोन ठळक वैगुण्ये म्हणजे महापुरुषांचे अपहरण आणि इतिहासाचे विकृतीकरण. त्यामुळे केवळ मराठ्यांच्या नव्हे, तर देशाच्या आणि जगाच्या इतिहासातही वादातीत व्यक्तिमत्त्व असलेल्या छत्रपती शिवरायांवरूनही महाराष्ट्रात नको इतके वाद घातले जात आहेत. हे महाराष्ट्राचे फार मोठे दुर्दैव आहे,’ अशी खंत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. राजा दीक्षित यांनी व्यक्त केली.
द. मा. मिरासदार प्रतिष्ठानातर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात दीक्षित बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे, रवींद्र मंकणी, प्रसाद मिरासदार, हरिभाऊ मिरासदार या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘गोष्ट इथे संपत नाही’ या नाटकाचे सादरकर्ते सारंग मांडके आणि सारंग भोईरकर यांना ‘द. मा. मिरासदार पुरस्कारा’ने गौरविण्यात आले.
दीक्षित म्हणाले, ‘दूरदृष्टी असलेल्या इतिहासकार शेजवलकरांनी साठ-सत्तर वर्षांपूर्वीच ‘इतिहासाचा संबंध महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेला आहे,’ असे उद्गार काढले होते. आता हे खरे झाले असे म्हणण्याची वेळ यावी, अशा पद्धतीचे वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसते. यात कोणा एकाचा दोष नाही. एका व्यक्तीला, एका संस्थेला किंवा एका संघटनेला याचा दोष देता येत नाही. एकंदरीतच या प्रकारचे वातावरण निर्माण झालेले दिसते.’
‘इतिहासाच्या कथाकथनासारख्या विषय सादरीकरणाला ज्या पद्धतीने तरुणांची गर्दी होते, हे अत्यंत आशादायी चित्र आहे,’ असे सोमण यांनी नमूद केले.
मिरासदार-फडणीस यांचा ‘साहित्यिक शेजार’
‘कॉलेजमध्ये असताना आम्ही विद्यार्थ्यांचे एक आंतरमहाविद्यालयीन मंडळ स्थापन केले होते. या मंडळाच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी द. मा. मिरासदार यांच्या सुभाषनगरमधील घरी गेलो होतो. तिथेच शेजारी प्रसिद्ध व्यंगचित्रकार शि. द. फडणीस राहत होते. त्यांचा हा शेजार केवळ राहण्यापुरता नव्हता, तर तो एक ‘साहित्यिक शेजार’, साहित्यिक स्नेह होता. त्यामुळे असे लक्षात येते की, मिरासदार यांच्या बहुतेक सर्व पुस्तकांना शि. द. फडणीस यांचीच मुखपृष्ठे लाभली. मिरासदारांचा विनोद आणि फडणीस यांचे व्यंगचित्र हे नेहमी एकमेकांच्या हातात हात घालून चालले,’ अशी आठवणही डॉ. राजा दीक्षित यांनी सांगितली.
‘द. मा. मिरासदार यांचे साहित्य म्हणजे मराठी विनोदी साहित्याच्या परंपरेतील ‘माईलस्टोन’ आहे. सर्वसाधारणपणे ‘माईलस्टोन’साठी ‘मैलाचा दगड’ असा शब्द वापरतात; पण तो ‘दगड’ शब्द मला फारसा आवडत नाही. त्यामुळे ‘स्मरणशिळा’ हा शब्द मी रूढ केला आहे. ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे साहित्य म्हणजे मराठी साहित्यविश्वातील एक मोठी ‘स्मरणशिळा’च आहे. – प्रा. राजा दीक्षित, ज्येष्ठ इतिहास संशोधक.
