“सद्यपरिस्थितीत शहरी भागात कारखान्यांचे प्रदूषित पाणी आणि मैलामिश्रीत पाणी पुरेशी प्रक्रिया न करताच नद्यांमध्ये सोडण्यात येते,” असं निरिक्षण जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी नोंदवलं आहे. तसेच विकासाच्या नावाखाली वेगाने वाढत चाललेले औद्योगिकीकरण आणि सदोष धोरणांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. परिणामी, मानवी जीवनच धोक्यात आले आहे, अशी चिंताही राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली. ते पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘नदी की पाठशाला’ कार्यक्रमात बोलत होते.

डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले, “आपल्या संस्कृतीत नदीला फार महत्त्व होते आणि आहे. नदीला मानवाची जीवनरेखा मानले जाते. नद्यांमध्ये कारखान्यांचे प्रदूषित आणि मैलामिश्रीत पाणी सोडले जाते. त्यामुळे नद्यांमधील जीवसृष्टी लोप पावत आहे. नद्यांवर अवलंबून असणाऱ्या इतर छोट्या-मोठ्या गावांना प्रदूषित पाण्याचा वापर करावा लागतो. हेच प्रदूषित पाणी शेतीसाठी, सिंचनासाठी वापरल्यामुळे शेत जमिनींचा दर्जा, पोत खालावतो आहे.”

“अशा प्रदूषित पाण्यामुळे अनेक व्याधींचा सामना करावा लागतो. या जागतिक समस्येवर विज्ञान तंत्रज्ञानाने आणि संशोधनाने उपाय शोधावा लागेल. जेणेकरून पुढील पिढ्यांचे जीवन सुखकर होईल. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करीत अभियंत्यांनी नद्यांचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी आवश्यक असणारी धोरणे राबविण्यासाठी सरकारवर सामाजिक दबाव निर्माण झाला पाहिजे,” अशी अपेक्षाही राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : बेकायदा दस्त नोंदणी प्रकरणात सरपंच, तलाठी, प्रांत अधिकारी रडारवर; १६२ बनावट एनए प्रकरणांची माहिती मागविली

या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. हरिश तिवारी, संस्थेच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण विभाग अधिष्ठाता डॉ. जान्हवी इनामदार आदी उपस्थित होते.