पुणे : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, राज्य नियोजन मंडळाचे दोन वेळचे माजी कार्यकारी अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे माजी प्रवक्ते व नेते डॉ. रत्नाकर महाजन (वय ८१) यांचे शुक्रवारी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्यामागे मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

महाजन यांच्या निधनाचे वृत्त समजताच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रक्षक सोसायटी येथील निवासस्थानी जाऊन डाॅ. रत्नाकर महाजन यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. महाजन यांच्या पार्थिवावर शनिवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता यासह राज्यघटनेच्या सर्व मूल्यांची प्रभावी मांडणी आपल्या वाणी व लेखणीद्वारे सतत करणारे रत्नाकर महाजन यांचा जन्म १४ जून १९४६ रोजी झाला होता. ते मूळचे इंदापूर तालुक्यातील बाभळगावचे. त्यांचे प्राथमिक शिक्षण इंदापूर येथे झाले. नंतर ते पुढील शिक्षणासाठी पुण्यात आले. विद्यार्थी दशेपासून ते सामाजिक कार्यात सक्रिय होते. तसेच वाचनाची आवड असलेला अभ्यासू कार्यकर्ता, नेता अशी त्यांची ओळख होती. युक्रांदसह अनेक चळवळीत ते सक्रिय होते. लोकबोधिनी ही संस्था त्यांनी स्थापन केली होती. काँग्रेस पक्षाचे मुखपत्र असलेल्या शिदोरी मासिकाचे संपादक म्हणूनही काही वर्षे त्यांनी काम केले होते. भ्रष्टाचार हा देशविकासातील सर्वात मोठा अडथळा आहे आणि जात ही देशापुढील एक मोठी समस्या आहे अशी भूमिका ते सतत मांडत राहिले. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शेती , उद्योग, रोजगार, नियोजन आदी अनेक महत्वपूर्ण विषयांवर प्रश्नांवर त्यांनी सतत मांडणी केली होती. ठाम राजकीय भूमिका असणाऱ्या डॉ. रत्नाकर महाजन यांना राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय राजकारणाची सखोल जाण होती.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यावर डॉ. महाजन हे त्यांच्यासोबत गेले. मात्र, काही काळानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. त्यांनी कायम जातीयवाद आणि धार्मिक वेडेपणाविरोधात कणखर भूमिका घेतली. अगदी तरुणपणात डॉ. कुमार सप्तर्षी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, रामदास आठवले, जयप्रकाश नारायण, रामविलास पासवान या सारख्या चळवळीत काम करणाऱ्या नेत्यांसोबत डॉ. रत्नाकर महाजन यांचा विशेष जिव्हाळा होता.

समाजवादी चळवळ, राष्ट्र सेवा दल आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात डाॅ. रत्नाकर महाजन यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीने, अस्खलित मराठीने आणि तर्कशुद्ध विचारांनी वेगळी ओळख निर्माण केली. राजकीय, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रातील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. – शरद पवार, ज्येष्ठ नेते