विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजण्यासाठी शालेय स्तरावर निसर्गाचा इतिहास शिकविला जावा, अशी अपेक्षा साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी सोमवारी व्यक्त केली.
क्लब वसुंधरातर्फे वसुंधरा महोत्सवांतर्गत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्याने आयोजित तिसऱ्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे उद्घाटन रोपाला पाणी देऊन करण्यात आले. या संमेलनाचे अध्यक्ष दिलीप कुलकर्णी, पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष हरिभाई शहा, एच. व्ही. देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य गिरीश पाठारे, प्रा. ए. पी. कुलकर्णी, परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन, महोत्सवाचे निमंत्रक वीरेंद्र चित्राव या वेळी उपस्थित होते.
मोरे म्हणाले,की शालेय स्तरावर निसर्ग आणि पर्यावरण याविषयीचा अभ्यास समाविष्ट केला गेला नाही तर हा विषयही इतिहासजमा होईल. योग्य वयामध्ये मुलांवर संस्कार होतील. त्यामुळे निसर्ग आणि पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यामध्ये मुलांनाही योगदान देता येईल. पूर्वी माणूस निसर्गाशी एकरुप झालेला होता. आता मानवाचा हस्तक्षेप वाढल्यामुळे निसर्गाला धोका पोहोचला आहे. निसर्गाच्या हद्दीचे शोषण होते तेव्हा पर्यावरणवाद महत्त्वाचा ठरतो. भांडवलशाहीने निसर्गाचा समतोल बिघडवला आहे. निसर्ग हा मानवाचा मालक किंवा गुलाम नसून तो मित्र आहे. विश्वस्ताच्या भूमिकेतून माणसाने निसर्गाचे जतन आणि संवर्धन केले पाहिजे.
भांडवलशाहीएवढीच साम्यवादानेही निसर्गाची हानी केली आहे. निसर्गावर मात करण्याच्या भावनेतून आपण भांडवलशाहीचा भाग कधी होऊन जातो हे आपल्यालाही कळत नाही, असे सांगून दिलीप कुलकर्णी म्हणाले, अमर्याद विकासाची वाढ थोपविली पाहिजे. निसर्गाचे रक्षण करण्याऐवजी आपण विनाशाकडे जात आहोत. निसर्गाचा आदर राखून आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता केली पाहिजे. स्वच्छतेविषयी जागृती झाली आहे. पण, हा कचरा उचलून आपण दुसरीकडे टाकतो तेव्हा तेथे समस्या निर्माण होतात ही बाब आपल्या ध्यानातच येत नाही.
डॉ. माधवी वैद्य यांनी प्रास्ताविक केले. सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले.