पुणे : ‘महात्मा जोतिराव फुले यांनी जात टिकवायला नाही, तर मोडायला सांगितले आहे. तुम्ही जात टिकवत असाल, तर केवळ तुमच्या हितसंबंधांसाठी, तुमची व्होटबँक बळकट राहावी म्हणून, असे सांगावे लागेल,’ असे मत संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी मंगळवारी व्यक्त केले.

संवाद, पुणेतर्फे आयोजित ‘सत्यशोधक महात्मा’ या नाटकाचे अभिवाचन आणि बोधचिन्ह अनावरण कार्यक्रमात डॉ. मोरे बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, माजी आमदार कमल ढोले-पाटील, गौरी राहुल ढोले-पाटील, संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, डॉ. रवी चौधरी आदी या वेळी उपस्थित होते.

मोरे म्हणाले, ‘आपल्या देशात अपवाद वगळता जातनिहाय पक्ष आहेत, हे वास्तव आहे. ते मोडून काढण्यासाठी महात्मा फुले यांचे विचार समजून घ्यायला हवेत. जातिव्यवस्था टिकवण्यासाठी नव्हे, तर ती नष्ट करण्यासाठी त्यांचे विचार समजून घेणे गरजेचे आहे. जात टिकविण्यासाठी फुले यांच्या विचारांचा कोणी दुरुपयोग करत असेल, तर फुले यांनी असे सांगितलेले नाही, असे सांगता आले पाहिजे.’

‘औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांसाठी पोकळी निर्माण झाली होती. महाराष्ट्रातील सगळ्या जाती-धर्मांचे लोक कर्तृत्व गाजवण्यासाठी देशभर गेले. त्या काळातल्या लोकांनी जातिव्यवस्थेचाही उपयोग करून घेतला. शेवटी, ज्याचे वर्चस्व असते, तो जास्त संधी घेतो. त्याप्रमाणे पुण्यात कोकणस्थांनी संधी घेतली. बाकीच्या कर्तबगार लोकांनी पुण्याबाहेरच्या वाटा चोखाळल्या. त्यामुळे बेकारीची समस्या नव्हती,’ असे त्यांनी नमूद केले.

मोरे पुढे म्हणाले, ‘इंग्रजांचे राज्य आले आणि सगळे एका झटक्यात बेकार झाले. लढाया थांबल्या. त्याचा सर्वांत मोठा फटका मराठ्यांना बसला. ते तलवार गाजवणारे असल्याने शेतीची व्यवस्था इतरांकडे असायची. अचानक शेतीचा ताण आणि दुष्काळासारख्या समस्या आल्या. मधल्या काळात ब्राह्मणांकडे ज्ञानसत्ता-राजसत्ता होती, ती गेली. पण, शिकण्या-शिकवण्याची परंपरा असल्याने कारभाराची सत्ता इंग्रजांच्या काळातही ब्राह्मणांकडेच राहिली. त्यामुळे समाजात आपोआप संघर्ष सुरू झाला. या संघर्षात जोतिरावांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यातूनच मोठी चळवळ उभी राहिली. आज या चळवळीला आपण शाहू-फुले-आंबेडकरी चळवळ म्हणतो.’

वारकरी संप्रदाय हा शूद्र, अतिशूद्र, स्त्रिया आणि ब्राह्मण्य सोडलेले ब्राह्मण या सगळ्यांचा आहे. ज्ञानेश्वरांनी आपल्या दास्याचा अभिमान सोडला आणि सर्वसामान्य माणसांच्या हितसंबंधांशी ते एकरूप झाले. त्यातून वारकरी संप्रदाय पुढे आला. तशीच मांडणी महात्मा फुले यांनी केली. सत्यशोधक समाजात जोतिरावांबरोबर असलेल्यांमध्ये वारकऱ्यांचा समावेश लक्षणीय आहे. – डॉ. संदानंद मोरे