ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ डॉ. सत्त्वशीला विठ्ठल सामंत (वय ६८) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सत्त्वशीला सामंत यांचा जन्म २५ मार्च १९४५ रोजी मुंबई येथे झाला. सत्त्वशीला परशुराम देसाई हे त्यांचे पूर्वीश्रमीचे नाव. संस्कृत आणि मराठी विषय घेऊन त्यांनी बी. ए. पदवी संपादन केली. एल. एल. बी. नंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून भाषाशास्त्र पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामध्ये १९६६ पासून त्यांनी प्रथम अनुवादक आणि नंतर सहायक संचालक म्हणून काम केले. भाषा उपसंचालक म्हणून कार्यरत असताना १९८६ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर भाषाविषयक विविध बौद्धिक उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला. ‘मराठी शुद्धलेखन’ या जिव्हाळ्याच्या विषयावर त्यांनी वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून स्फुट आणि चिंतनपर लेखन केले.
ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांची कन्या विरा शर्मा यांच्या मूळ इंग्रजी कथांचा डॉ. सत्त्वशीला सामंत यांनी ‘आहेर’ हा अनुवाद केला. १९९७ मध्ये ग्रंथाली प्रकाशनने हा संग्रह प्रकाशित केला होता. त्यांच्या ‘व्याकरण शुद्धलेखन प्रणाली’ या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. या पुस्तकाला महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे. ‘शब्दानंद’ हा त्यांचा व्यवहारोपयोगी विषयवार त्रभाषिक (मराठी, हिंदी, इंग्रजी) शब्दकोश डायमंड पब्लिकेशनने प्रकाशित केला आहे. या शब्दकोशाला राज्य शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारासह महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd May 2013 रोजी प्रकाशित
ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ डॉ. सत्त्वशीला सामंत यांचे निधन
ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ डॉ. सत्त्वशीला विठ्ठल सामंत (वय ६८) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवारी रात्री निधन झाले.
First published on: 02-05-2013 at 07:34 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr satvasheela samant passed away