‘सेवा माणसाला अधिक संवेदनशील, कृतज्ञ आणि सकारात्मक बनवते,’ या विचाराने काम करणारे डॉ. सौरभ यशवंत जोशी यांनी रासायनिक अभियांत्रिकी शिकून केलेले पर्यावरणविषयक संशोधन मानवासाठी कसे उपयोगी पडते आहे, त्याची जागतिक मानवता दिवसाच्या (१९ ऑगस्ट) निमित्ताने ओळख. श्रीराम ओक यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

संशोधनाच्या मार्गावर वाटचाल करावी, असे कधी आणि कसे वाटले?

  • शाळेमध्ये शिक्षक आपल्यावर जे संस्कार करतात, ते आयुष्यभर उपयोगी पडतात. ते जीवनाला दिशा देणारेही असतात. मला सांगलीतील सिटी हायस्कूलमध्ये शिकताना सातवीत शिष्यवृत्ती मिळाली. तेव्हा झालेला माझा सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी ठरला. स्वतःचे काही तरी करून दाखवायचे, असे मी त्याच वेळी ठरवले होते आणि तशी संधीही मला मिळाली.

तुम्ही कोणत्या प्रकारचे संशोधन केलेत?

  • माझ्या संशोधनाचा विषय वायुप्रदूषण नियंत्रणाशी संबंधित असल्यामुळे पर्यावरण संवर्धनाविषयी विशेष जिव्हाळा निर्माण झाला. वाहनांच्या धुरामधील हानिकारक नायट्रोजन ऑक्साइड वायू कमी करण्यासाठी विशेष उत्प्रेरक (कॅटॅलिस्ट) वापरले जातात. सर्वसाधारणपणे तापमान वाढले, की रासायनिक अभिक्रियेचा वेगही वाढतो, असे विज्ञानात मानले जाते. मात्र, अनेक दशकांच्या संशोधनानंतरही लक्षात न आलेले निरीक्षण आम्ही संशोधनादरम्यान शोधून काढले. खूप जास्त तापमानात अमोनिया उत्प्रेरकाच्या पृष्ठभागावरून झपाट्याने निघून जात असल्यामुळे ही प्रदूषण कमी करणारी अभिक्रिया उलट मंदावते. या नव्या शोधामुळे भविष्यात अधिक कार्यक्षम आणि कमी प्रदूषण करणाऱ्या वाहनांसाठी चांगल्या उत्सर्जन-नियंत्रण प्रणाली विकसित करता येतील. या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, ते उत्प्रेरक आणि पर्यावरण अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रतिष्ठित अशा अप्लाइड कॅटॅलिस्ट बी-एन्व्हायर्न्मेंटल या जर्नलमध्ये प्रकाशित झाले.

या संशोधनासाठी शालेय अभ्यासक्रमातील कोणत्या विषयांचा उपयोग झाला ?

  • विज्ञान, गणित हे विषय म्हणजे माझी केवळ आवड नाही, तर ती माझ्या आयुष्याची दिशा आहे. आयसीटी (पूर्वीचे यूडीसीटी), मुंबई येथे घेतलेल्या शिक्षणामुळे रासायनिक अभियांत्रिकीची भक्कम पायाभरणी झाली. त्यानंतर पीएच.डी. पूर्ण केल्यावर मला अमेरिकेतील कमिन्स या जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. गेल्या अनेक वर्षांपासून या कंपनीबरोबर कार्यरत असताना गणिती प्रारूपे, संगणकीय सिम्युलेशन, डेटा सायन्स आणि अभियांत्रिकी संशोधनाच्या माध्यमातून गुंतागुंतीच्या औद्योगिक आणि पर्यावरणविषयक समस्यांवर उपाय शोधण्याचे काम करत आहे. वैज्ञानिक सिद्धान्तांचा प्रत्यक्ष औद्योगिक समस्यांवर उपयोग करण्याचा हा अनुभव माझ्या व्यावसायिक प्रवासातील अत्यंत समाधानकारक भाग आहे. पीएच.डी.च्या संशोधनापासून अमेरिकेतील औद्योगिक क्षेत्रात काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे विज्ञानाचा खरा उपयोग तेव्हा होतो, जेव्हा ते समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी वापरले जाते.
    स्वतःचे आरोग्य आणि सामाजिक कार्य यांचा समतोल कसा साधता?
  • कुटुंब आणि मित्र हेच माझ्यासाठी आयुष्यातील सर्वांत मोठे धन आहे. जोडीने धावणे आणि नियमित व्यायाम ही माझ्यासाठी केवळ आरोग्याची सवय नाही, तर जगण्याची पद्धत आहे. धावताना मन शांत होते, विचार स्पष्ट होतात आणि प्रत्येक दिवस नव्या ऊर्जेने सुरू करण्याची प्रेरणा मिळते. केवळ व्यावसायिक यश पुरेसे नसते; मानसिक शांतता, शारीरिक आरोग्य आणि त्याबरोबरच समाजाशी जोडलेले राहणेही तितकेच आवश्यक असते. सेवा हा माझ्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन’च्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य करण्याची संधी मला मिळाली. त्याचबरोबर ध्यानाचा सरावही शिकायला मिळाला. या अनुभवांमुळे समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करण्याची प्रेरणा आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मिळाला. कोणतीही अपेक्षा न ठेवता समाजासाठी केलेले कार्य माणसाला आतून समृद्ध करते. सेवा माणसाला अधिक संवेदनशील, कृतज्ञ आणि सकारात्मक बनवते.

shriram.oak@expressindia.com