पुणे : ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष हिरेमठ यांच्या पार्थिवावर शनिवारी पुण्यातील धोबीघाट स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.डॉ. शिरीष हिरेमठ (वय ७५) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पत्नी असा परिवार आहे. रविवारी सकाळी साडेदहा ते बारा या वेळेत रुबी हॉल क्लिनिकमध्ये डॉ. हिरेमठ यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर परवेझ ग्रँट यांनी आदरांजली वाहिली. यानंतर डॉक्टर राजीव देशमुख, डॉक्टर रवी गुलाठी, डॉ. सी. एन. माखले यासह अनेक ज्येष्ठ डॉक्टर्स उपस्थित होते. त्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी रुबी हॉल क्लिनिक मधील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी त्यांनी डॉक्टर शिरीष हिरेमठ यांच्याशी असणारे ऋणानुबंध आणि आठवणींना उजाळा दिला. वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे कार्य आणि सेवा सर्वांना प्रेरणा देत राहील अशी भावना यावेळी उपस्थित त्यांनी व्यक्त केली.
रुबी हॉल क्लिनिक मधील बाह्यरुग्ण विभाग डॉ. हिरेमठ यांच्याच नावाने सुरू राहणार…
गेल्या दोन वर्षांपासून डॉ. हिरेमठ मेंदूतील गंभीर आजाराशी झुंज देत होते. अखेर गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. हिरेमठ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ रुबी हॉल क्लिनिकमधील हृदयरोगासाठीचा बाह्यरुग्ण विभाग यापुढेही त्यांच्या नावानेच सुरू राहणार आहे. १९९८ पासून डॉ. हर्षल इंगळे, डॉ. राहुल नागदा हे डॉ. हिरेमठ यांच्याबरोबर कार्यरत होते. गेल्या दोन वर्षांपासून डॉ. हिरेमठ आजारी असल्याने त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी बाह्यरुग्ण विभागाची जबाबदारी सांभाळली. यापुढेही हा विभाग हिरेमठ यांच्या नावाने ओळखला जाणार असून, रुग्णांना उत्तम दर्जाची उपचारसेवा देण्याचा वारसा जोपासला जाणार असल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.
पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या डॉ. हिरेमठ यांनी १९८२ पासून वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय सेवा दिली. रुबी हॉल क्लिनिक येथे ‘कार्डियाक कॅथ लॅब’चे संचालक म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ जबाबदारी सांभाळली. वैद्यकीय क्षेत्रात ते ‘एमएसएच’ या नावाने परिचित होते. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांवर ‘फार्माको-इन्व्हेसिव्ह’ पद्धतीने उपचार करण्याची पद्धत त्यांनी देशात लोकप्रिय केली. डॉ. हिरेमठ यांनी हृदयरोगावरील उपचारांमध्ये, गुंतागुंतीच्या अँजिओप्लास्टी प्रक्रियांमध्ये योगदान दिले. पुण्यातील पहिली अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया १९८९ मध्ये त्यांनी केली. ‘कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे ते माजी अध्यक्षही होते.मात्र, त्यांना मेंदूतील गाठीच्या कर्करोगाचे निदान झाल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली होती. अशातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रातील एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.’ अशी भावना ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एस. जी. भाटे यांनी व्यक्त केली.
