scorecardresearch

प्रायोगिक रंगभूमीसाठी नाटय़गृहाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी संकल्प करावा – अरुण काकडे

प्रायोगिक रंगभूमीसाठी स्वतंत्र नाटय़गृह बांधून देण्याचे आश्वासन पुणे महापालिकेने ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले होते. अजूनही हे काम रेंगाळलेलेच आहे.

प्रायोगिक रंगभूमीसाठी स्वतंत्र नाटय़गृह बांधून देण्याचे आश्वासन पुणे महापालिकेने ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले होते. त्यानुसार घोले रस्त्यावर कामही सुरू करण्यात आले होते. मात्र, अजूनही हे काम रेंगाळलेलेच आहे. नाटय़संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांच्यासह कलाकार आणि नाटय़प्रेमी रसिकांनी सह्य़ांचे निवेदन महापालिकेला सादर करून या नाटय़गृहाचे काम लवकर पूर्णत्वास नेण्यासाठीचा संकल्प करावा, अशी सूचना पंढरपूर येथे होणाऱ्या नाटय़संमेलनाचे नियोजित अध्यक्ष अरुण काकडे यांनी गुरुवारी केली.
रंगभूमी दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद पुणे शाखेतर्फे अरुण काकडे यांच्या हस्ते ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांना जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्कार आणि दिग्दर्शक अतुल पेठे यांना चित्तरंजन कोल्हटकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री दीपा श्रीराम, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक, नाटय़ परिषदेचे शाखाध्यक्ष सुरेश देशमुख, उपाध्यक्ष दादा पासलकर आणि प्रमुख कार्यवाह दीपक रेगे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
गेली ५० वर्षे मुंबईमध्ये वास्तव्यास असलो, तरी मी मूळचा पुणेकरच आहे, असे सांगून काकडे म्हणाले, प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन म्हणजेच ‘पीडीए’मध्ये भालबा केळकर यांच्यासह वासुदेव पाळंदे, डॉ. श्रीराम लागू, श्रीधर राजगुरू, जयंत धर्माधिकारी, लीला अर्जुनवाडकर यांच्याबरोबर काम केले. पीडीएमध्येच निर्मिती, व्यवस्थापनाची कला आत्मसात केली आणि मुंबईला ‘आविष्कार’ संस्थेमध्ये ही दृष्टी विकसित झाली. प्रायोगिक नाटकाची चळवळ करणाऱ्यांचे दोन प्रयोगातच कंबरडे मोडते. तिसरा प्रयोग करता येत नाही, अशी अवस्था आहे. नांदेड येथील नाटय़संमेलनामध्ये राज्य सरकारतर्फे व्यावसायिक नाटकांना अनुदान देण्याची घोषणा झाली. तेव्हा प्रायोगिक नाटकांनाही अनुदान मिळाले पाहिजे, अशी मागणी मी केली होती. त्याला यश आले असून राज्य सरकारने या संदर्भातील शासकीय अध्यादेशही काढला आहे. १ एप्रिल २०१४ पासून प्रायोगिक नाटकांनाही अनुदान योजना लागू होणार आहे.
अतुल पेठे म्हणाले, रंगभूमी सध्या एका आवर्तातून जात असून गावोगावचे लेखक, दिग्दर्शक, कलावंत संपत आहेत. याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. सवंग करमणूक म्हणून आम्ही नाटकाकडे पाहणार असू, तर गंभीर नाटक करायचे कोणासाठी हा प्रश्न आहे.
या वेळी अंबिका भालेकर आणि रागिणी गोखले यांना लक्ष्मीमाता पुरस्कार, जयश्री तारे यांना प्रपंचलक्ष्मी पुरस्कार, मंगला बनसोडे आणि रामचंद्र करवडीकर यांना लक्ष्मीनारायण पुरस्कार प्रदान करण्यात आला. शशिकांत कुलकर्णी, प्रभाकर तुंगार, सदाशिव गुप्ते आणि श्रीपाद गोखले या अमृतमहोत्सवी वर्षांतील रंगकर्मीचा सत्कार करण्यात आला. देशमुख यांनी प्रास्ताविक केले. शुभांगी दामले यांनी आभार मानले. मकरंद टिल्लू आणि निकिता मोघे यांनी सूत्रसंचालन केले.
दिल्लीत मराठीचा झेंडा फडकावा
दिल्लीमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग होत नाहीत. याबाबत सरकारही उदासीन आहे. पुढच्या वर्षीपासून रंगभूमी दिन दिल्लीमध्ये साजरा झाला पाहिजे आणि मराठी नाटकांचा झेंडा फडकला पाहिजे यासाठी राज्य सरकारला अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्याची विनंती करणार असल्याचे अरुण काकडे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-11-2013 at 02:45 IST

संबंधित बातम्या