गुरुत्वाकर्षण, विश्वरचनाशास्त्र या क्षेत्रातील योगदानासाठी जगभरात ओळख निर्माण केलेले ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. टी. पद्मानाभन (वय ६४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज (शुक्रवार) पुण्यात निधन झाले. डॉ. पद्मानाभन आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्रात (आयुका) मानद प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी वासंती, कन्या हंसा असा परिवार आहे. डॉ. पद्मानाभन यांच्यावर औंध येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

केरळ विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी आणि पदव्युत्तर पदवी संपादन के ल्यानंतर पद्मानाभन मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेशी (टीआयएफआर) जोडले गेले. त्यानंतर टीआयएफआरमध्येच १९८० पासून अध्यापन सुरू केले. १९८० ते १९९२ या कालावधीत संस्थेतील विविध पदांवर काम केले. तर केंब्रिज येथील खगोलशास्त्र संस्थेतही वर्षभर काम केले. १९९२ मध्ये ते आयुकामध्ये अधिष्ठाता म्हणून रुजू झाले. गुरुत्त्वाकर्षण, विश्वरचनाशास्त्र अशा क्षेत्रांत त्यांनी केलेले संशोधन जगभरात महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यांच्या संशोधनातून खगोलशास्त्राला नवी दिशा मिळाली. डॉ. पद्मानाभन यांनी ‘नोशन ऑफ कॉस्मिक इन्फॉर्मेशन’ ही नवी संकल्पना मांडली. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्यासह त्यांनी दीर्घकाळ संशोधन केले. खगोलशास्त्रातील त्यांच्या संशोधन कार्याचा २००७ मध्ये पद्माश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. त्याशिवाय त्यांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार, इन्फोसिस सायन्स फाउंडेशन पुरस्कार असे विज्ञान क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले होते. पद्मानाभन यांनी २००९ ते २०१२ या कालावधीत आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेच्या विश्वरचनाशास्त्र विभागाचे अध्यक्षस्थान भुषवले होते.

डॉ. पद्मानाभन यांचे भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र विषयांतील तीनेशहून अधिक शोधनिबंध नामांकित संशोधनपत्रिकांमध्ये प्रसिद्ध झाले होते. तसेच पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीसह आफ्टर द फस्र्ट थ्री मिनिट्स : द स्टोरी ऑफ अवर युनिव्हर्स, स्ट्रक्टरल इन्फॉर्मेशन इन युनिव्हर्स, अ‍ॅन इन्व्हिटेशन टू अ‍ॅस्ट्रोफिजिक्स अशा बऱ्याच पुस्तकांचे लेखनही के लेले आहे.