पुणे : तब्बल सात महिन्यांनंतर नाट्यगृहे सुरू होण्याची वेळ जवळ आली असून नाट्यसंस्था आता तारीख वाटपाची प्रतीक्षेत आहेत. तारीख वाटप झाल्याखेरीज जुळवाजुळव करून कार्यक्रमाची घोषणा करता येत नाही, अशी नाट्यव्यवस्थापकांची अडचण आहे.

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शुक्रवारपासून (२२ ऑक्टोबर) रंगभूमीचा पडदा उघडणार आहे. कलाकार आणि निर्माते मंडळी प्रेक्षकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली असून, पुन्हा त्याच जोमात रसिकांच्या टाळ्यांचा कडकडाट अनुभवण्यासाठी कलाकारांच्या नाटकांच्या तालमी सुरू झाल्या आहेत. 

महापालिकेच्या नाट्यगृहांमधील साफसफाई, डागडुजी आणि निर्जंतुकीकरण करण्याच्या कामांना वेग आला आहे. नाट्यगृहांच्या तारखा मिळण्यासाठी निर्मात्यांचे अर्ज महापालिकेकडे आले आहेत.

सरकारने नाट्यगृहांसाठी जाहीर केलेली नियमावली गुंतागुंतीची आहे. प्रेक्षकांनी मुखपट्टी परिधान केली की नाही ते निर्मात्याने पाहावयाचे आहे. ५० टक्के क्षमतेने नाटक करण्याचे नुकसान आम्ही सहन करणार आहोत. प्रेक्षकांचे लसीकरण झाले आहे की नाही हे आम्हीच पाहायचे का, असा सवाल नाट्यनिर्मात्यांकडून केला जात आहे.

नाट्यगृहांची साफसफाई च्या कामांना सुरुवात झाली आहे. निर्मात्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंतच्या तारखा सध्या दिल्या जात आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या तारखांसाठी वाटप लवकरच केले जाणार आहे. रविवारी

(दि. २४) व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग होणार असून सुरक्षित अंतर ठेवून बसण्यासाठीच्या आसन व्यवस्थेसह विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

सुनील मते, प्रमुख व्यवस्थापक, बालगंधर्व रंगमंदिर