नाटय़गृहे आजपासून खुली ; बालगंधर्व रंगमंदिरामध्ये तिसरी घंटा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते नटराजपूजन

पुणे : तब्बल सात महिन्यांच्या कालखंडानंतर बालगंधर्व रंगमंदिरामध्ये गुरुवारी तिसरी घंटा निनादली. नाटय़गृहे शुक्रवारपासून (२२ ऑक्टोबर) खुली होत असताना गुरुवारी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते तिसरी घंटा वाजवून कलाकारांच्यावतीने स्वागत करण्यात आले. नाटय़गृहे शुक्रवारपासून रसिकांसाठी खुली करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी संवाद पुणे संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते नटराज […]

करोना संसर्गाच्या कालावधीतील दीर्घ बंदनंतर नाटय़गृहांचा पडदा शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) उघडणार आहे. या पार्श्वभूमीवर चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात गुरुवारी कर्मचाऱ्यांकडून प्रेक्षागृहाच्या स्वच्छतेबरोबरच तांत्रिक कामे पूर्ण करून रंगमंच सज्ज करण्यात आला. (छायाचित्र- राजेश स्टीफन)

पुणे : तब्बल सात महिन्यांच्या कालखंडानंतर बालगंधर्व रंगमंदिरामध्ये गुरुवारी तिसरी घंटा निनादली. नाटय़गृहे शुक्रवारपासून (२२ ऑक्टोबर) खुली होत असताना गुरुवारी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते तिसरी घंटा वाजवून कलाकारांच्यावतीने स्वागत करण्यात आले.

नाटय़गृहे शुक्रवारपासून रसिकांसाठी खुली करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी संवाद पुणे संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, संवाद संस्थेचे  सुनील महाजन, निकिता मोघे, वंदन नगरकर, मोनिका जोशी, शशिकांत कोठावळे यांच्यासह पडद्यामागचे कलाकार या वेळी उपस्थित होते.

 करोनाचे काळे ढग दूर सारून नाटय़ कला साहित्य क्षेत्रात आता पुन्हा एकदा कलेच्या अवकाशात इंद्रधनुष्य खुलेल, असा विश्वास डॉ. गो-हे यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या,की करोनामुळे गेली दीड-दोन वर्षे सांस्कृतिक क्षेत्र झाकोळले गेले होते. सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी घडणा-या पुणेकरांना घरात कोंडून घ्यावे लागले. यामुळे कलाकार तर त्रस्त झालेच, त्याच बरोबर रसिक पुणेकरांना देखील खूप त्रास झाला. या काळात अनेकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. हा नकारात्मक भूतकाळ विसरून आता उगवत्या लख्ख पहाटेचे स्वागत करायचे आहे.

देखणे म्हणाले,की केवळ नाटय़गृहाचेच नाही, तर कलाकारांच्या आशेचे द्वार उघडले गेले आहे.  सांस्कृतिक क्षेत्राला लागलेला आणीबाणीचा काळ सरला असून आता नव्या उमेदीने नटराजाची सेवा करायची.

गांधी म्हणाल्या,की कलाकारांच्या दृष्टीने हा आनंदाचा दिवस असून आता थांबायचे नाही. भविष्यात कोणावरही अशी वेळ येऊ नये अशी परमेश्वर चरणी प्रार्थना आहे.

नाटय़गृहांमध्ये तयारी पूर्ण

बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाटय़गृह, अण्णा भाऊ साठे नाटय़गृह आणि गणेश कला क्रीडा मंच या शहरातील महापालिकच्या नाटय़गृहांची तयारी पूर्ण झाली आहे. सर्व नाटय़गृहांची स्वच्छता अंतिम टप्प्यात आली असून आता रसिक प्रेक्षकांच्या स्वागतासाठी नाटय़गृहे सज्ज झाली आहेत. सुरक्षित अंतर ठेवण्याच्या निकषांचे पालन करीत एक खुर्ची सोडून दुसऱ्या प्रेक्षकाला बसता येणार असल्याने मधली खुर्ची सुतळीने बांधण्यात आली आहे.

विद्यापीठात आज नाटकाची तिसरी घंटा.!

पुणे : जवळपास गेली दीड वर्षे बंद असणारी नाटकाची घंटा शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वाजणार आहे. विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या वतीने नामदेव सभागृह येथे सायंकाळी साडेसहा वाजता ‘वाघाची गोष्ट’ हे नाटक सादर करण्यात येणार आहे.

मार्च २०२० पासून टाळेबंदी आणि इतर अनेक निर्बंधांमुळे महाराष्ट्रभर सांस्कृतिक कार्यक्रम व नाटकांचे प्रयोग जवळजवळ ठप्प झालेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही एकत्र येत आपली कला सादर करता येत नव्हती. मात्र आता हे निर्बंध शिथिल केल्याने वाघाची गोष्ट या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आलेला आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार तिसरी घंटा देणार आहेत. मूळ इटालियन भाषेतील हे नाटक दारिओ फो या नोबेल पुरस्कार विजेत्या नाटककाराने लिहिलेले असून त्याचा मराठी अनुवाद विनोद लव्हेकर यांनी केलेला आहे. या नाटकाचे दिग्दर्शन महेश खदारे यांनी केलेले आहे. तर शुभम साठे आणि ऋत्विक तळवलकर हे या नाटकात अभिनय करत आहेत. नाटकाचा कालावधी एक तास असून या विनामूल्य नाटयप्रयोगाचा रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन ललित कला केंद्राचे प्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांनी केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Drama theater in pune open from today zws

Next Story
राज्याला वीज टंचाई भासणार नाही- पवार
ताज्या बातम्या