काशीनाथ देवधर
संरक्षणाचे मानबिंदू या सदरामध्ये पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या संरक्षण आस्थापना आणि देशाच्या संरक्षण व्यवस्थेत या संस्थांचे योगदान याची नोंद घेतली जाते. दर १५ दिवसांनी हे सदर प्रसिद्ध होते. आज, ‘आरडीई’ (इं) या महत्त्वाच्या संस्थेविषयी जाणून घेऊ.
आपल्या सर्वांना अभिमान वाटावा अशी ‘अवकाश शक्ती’ करण्यामध्ये संरक्षण, संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) ज्या प्रयोगशाळांचा सहभाग होता, त्यातील पुणेस्थित एक प्रमुख संस्था म्हणजे संशोधन आणि विकास संस्था (इंजिनीअर्स) (आरडीई (इंजिनीअर्स)) होय. २७ मार्च २०१९ रोजी भारताने ‘उपग्रहभेदी क्षेपणास्त्र’ अर्थात A-SAT (Anti-Satellite Missile) ची स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून यशस्वी चाचणी घेतली. असे करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला.
पृथ्वीभोवती तीनशे किलोमीटर अंतरावर, निम्नपृथ्वी कक्षेत, प्रचंड वेगाने फिरणाऱ्या आपल्याच अन्य एका ‘मायक्रोसॅट-आर’ या भू-निरीक्षण करणाऱ्या कार्यरत लघुउपग्रहाला या चाचणीत भेदण्यात आले. पृथ्वीवरून क्षेपणास्त्र डागून केवळ १६८ सेकंदात या उपग्रहाचा लक्ष्यभेद करण्यात आला. पहिल्याच प्रयत्नात या उपग्रहाचे तुकडे- तुकडे झाले. अशा महत्त्वाच्या A-SAT या स्वदेशी तंत्रज्ञानातील प्रक्षेपक यंत्रणा विकसित करणारी ‘डीआरडीओ’ची महत्त्वाची संस्था म्हणजे आरडीई (इंजिनीअर्स).
‘डीआरडीओ’ची पुण्यातील ही तिसरी महत्त्वाची संस्था दिघी येथे आहे. आपली सशस्त्र सेनादले व इतर सुरक्षा दलांना उपयुक्त ठरतील, अशी अत्याधुनिक व अद्ययावत अभियांत्रिकी प्रणालीवर या ठिकाणी संशोधन होते. असे संशोधन करून विविध उपकरणे, साधने व तंत्रज्ञान विकसित केले जाते. हे अद्ययावत तंत्रज्ञान सेनादलांना उपलब्ध करून दिले जाते. ही संस्था पुढील स्वदेशी उत्पादने व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत आहे.
१. गतिशीलता व गणक-गतिशीलता प्रणाली
२. आयुध व मानवरहित हवाई वाहने (UAV) प्रक्षेप प्रणाली
३. कंपोझिट सामग्री उपयोगद्वारा उन्नत उत्पादने
४. क्षेत्र रक्षण व CBRNE सामूहिक संरक्षण प्रणाली
५. रोबोटिक्स व मानवरहित प्रणाली
६. माईक्रो-इलेक्ट्रो- मेकॅनिकल प्रणाली
७. विशेषीकृत विद्युत प्रणाली व उपाय
८. विशेषीकृत अभियांत्रिकीय उपकरणे व साधने
या संस्थेने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सेनादलांना सहाय्यभूत ठरतील, अशी असंख्य उत्पादने विकसित केली आहेत आणि सेनादलांकडे सुपूर्त केली आहेत. यामध्ये पर्वतारोहणासाठी साधने, लक्ष्य-UAV साठीचे चल प्रक्षेपक, ५ मीटर लघु अंतर पूल यंत्रणा (Short Span Bridging System), लढाऊ विमानांना अडकवणारी प्रणाली ( Craft Arrester System), सुरुंग पेरणी प्रणाली (Bar Mine Layer System), मिश्रपदार्थ तंत्रज्ञान (Composite Technology), भूसुरुंग विद्ध्वंसक / निष्क्रियीकरण प्रणाली (Canter Mine Flail) क्षेपणास्त्रांची भूस्थित सहयोग प्रणाली (Grand Support System for missiles), आण्विक, रासायनिक व जैविक हल्ल्यांपासून जवानांना सुरक्षित ठेवणारे घडीचे निवारे (NBC Shelters) ज्यामध्ये हवा भरून ते उभे करता येतात व इतर वेळी हवा काढून घडी करून ठेवता येतात, दुसरीकडेही नेता येतात. (Storage & Tansportable) आदींचा समावेश करता येईल.
याचबरोबर पाण्याखालून जाणारे क्षेपणास्त्र, वाहनासाठीचा प्रक्षेपक, सुरुंगक्षेत्र निर्देशित करणारी यंत्रणा, लक्ष्य UAV साठी प्रक्षेपक, स्थिरबरोबरच गतिशील (Mobile) NBC Shelter, छोट्या-मोठ्या अंतराचे विविध तात्पुरते पूल, जे जलद उभारले जातील व सैन्याची आवश्यकता संपल्यास त्वरित गुंडाळून किंवा उतरवून पुढे जातील अशांची निर्मिती करण्यात आली आहे. पुलांची उदाहरणे द्यायची झाल्यास त्यात डोंगरी पादचारी पूल (Mountain Foot Bridge) सर्वत्र (Sarvatra), बिनाआधार ४६ मीटर पूल इत्यादी साधने या संस्थेने संशोधित केली आहेत. या ठिकाणी प्रामुख्याने विविध विषयांतील अभियांत्रिकी म्हणजे यंत्र, विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स कंट्रोल, गाइडन्स, इंस्ट्रुमेन्टेशन, संगणक आदी विषयातील तज्ज्ञांची गरज असते.
संमिश्र पदार्थ तंत्रज्ञानाद्वारा मोठ्या रचना स्तरप्रस्तर वापरून निर्माण केलेले सोनार डोम अथवा रणगाडा पूलनिर्मिती, एमईएमएस (मायक्रो-इलेक्ट्रो-मेकॅनिकल सिस्टीम), एमओईएमएस (मायक्रो-ऑप्टो-इलेक्ट्रो-मेकॅनिकल सिस्टीम), क्षेपणास्त्र प्रक्षेपक असे सर्व तंत्रज्ञान व उत्पादन या संस्थेत होते. भारत आत्मनिर्भर होण्यामध्ये या संस्थेने मोठी भूमिका बजावली आहे. २०४७ मधील विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी या संस्थांचे योगदान मोलाचे राहणार आहे.
याखेरीज, पुण्यामध्ये मोबाइल सिस्टीम्स कॉम्प्लेक्स (एमएससी) ही संरक्षण, संशोधन व विकास संस्थेंतर्गत (डीआरडीओ) असलेली आस्थापना आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव या आस्थापनेची सार्वजनिक स्वरुपात फारशी माहिती उपलब्ध नाही.
kddeodhar@rediffmail.com
(लेखक संरक्षण, संशोधन व विकास संस्थेमधील (डीआरडीओ) वरिष्ठ वैज्ञानिक आहेत आणि ‘एआरडीई’मधून समूह संचालक (ग्रुप डायरेक्टर) पदावरून निवृत्त झाले आहेत.)
