अवघ्या काही महिन्यांत पायलट होण्याचे सोहेल अन्सारी या युवकाने पाहिलेले स्वप्न एका दुर्दैवी अपघातामध्ये भंगले. उंच आभाळामध्ये जाण्याआधीच काळाने झडप घातली आणि १९ वर्षांच्या कोवळ्या सोहेलच्या अकाली निधनाची बातमी ताडीवाला रस्ता परिसराला हळहळ देऊन गेली.
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्य़ात एकच वैमानिक बसण्याची क्षमता असलेले विमान कोसळून झालेल्या अपघातामध्ये सोहेल अन्सारी या प्रशिक्षणार्थी वैमानिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ताडीवाला रस्ता परिसरातील एका गल्लीमध्ये अन्सारी कुटुंब वास्तव्यास आहे. १० फूट बाय १२ फूट अशा छोटेखानी घरामध्ये आई-वडील, भाऊ आणि दोन बहिणी असा सोहेल याचा सहा जणांचा परिवार. त्याचे वडील झहिरुद्दीन अन्सारी हे छोटीशी बेकरी चालवितात. ही बेकरी हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. सोहेल याचे वडील हृदयविकाराने आजारी असून या दुर्दैवी अपघाताची माहिती अजून त्यांना देण्यात आलेली नाही. गोंदिया येथील विमानतळावरून मंगळवारी (२४ डिसेंबर) दुपारी उड्डाण केल्यानंतर काही वेळाने वैमानिकाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. मात्र, आपला सोहेल परत येईल या आशेवरच अजूनही त्याचे वडील त्याची वाट पाहत आहेत. हवाई दल अधिकाऱ्यांनी अजून सोहेल बेपत्ता असल्याचे सांगितले आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळालेला नाही. त्यामुळे सोहेल परत येईल, असे झहिरुद्दीन यांनी सांगितले.
गेल्याच वर्षी बारावी उत्तीर्ण झालेल्या सोहेल याची सहा महिन्यांपूर्वी रायबरेली येथील इंदिरा गांधी उडान अकादमीमध्ये निवड झाली होती. तो या अभ्यासक्रमासाठीची सीईटी उत्तीर्ण झाला होता. या प्रशिक्षणासाठी ४० लाख रुपये शुल्क सामान्य व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचे होते. मित्र आणि नातेवाइकांकडून उसने पैसे घेऊनही रक्कम उभी राहत नव्हती. सोहेल याला १० लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली होती. अखेर एका मित्राने आपले घर तारण ठेवून सोहेल याला बँकेकडून कर्ज मिळवून दिले. पायलट होण्याचे सोहेल याचे स्वप्न अखेर अपुरेच राहिले.