पुणे : दुबईहून मुंबई विमानतळावर पाठविण्यात अलोले लॅपटाॅप, मोबाइल संच सोडविले नाहीत, असे सांगून दाऊद इब्राहिम टाेळीच्या नावे महसूल गुप्तचर यंत्रणेतील उपसंचालकासह त्याच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याच धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत महसूल गुप्तचर यंत्रणेतील (डिरेक्टोरेट रेव्हेन्यू इंटलिजन्स) उपसंचलकांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे महसूल गुप्तचर यंत्रणेच्या पुणे विभागीय कार्यालयात उपसंचालक आहेत. २०२४ पासून ते पुणे काार्यालयात कार्यरत आहेत. ३ जून रोजी ते मूळगावी निघाले होते. त्या वेळी आरोपीने त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. ‘मी तुमच्याकडे खबऱ्या (इन्फाॅर्मर) म्हणून काम करण्यास इच्छुक आहे. मला तुमच्याशी बोलायचे आहे,’ असे आरोपीने त्यांना सांगितले. प्रवासात असल्याने तक्रारदार उपसंचालकांनी नंतर बोलू असे आराेपीला सांगितले. त्यानंतर ते बिहध्मध्ये पोहाेचले. ५ जून रोजी ते पाटणा येथे निघाले होते. त्या वेळी आरोपीने पु्न्हा त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला.

‘मी दुबईहून भारतात येत होतो. मुंबई विमानतळावर माझे काही लॅपटाॅप, मोबाइल संच हे केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) जप्त केले आहे. कस्टम अधिकाऱ्यांना सांगून वस्तू त्यांच्या ताब्यातून सोडवून द्या’, असे आरोपीने त्यांना सांगितले. त्यानंतर ६ जून रोजी पहाटे पावणेचारच्या सुमारास आरोपीने समाज माध्यमातील संदेश यंत्रणेचा (व्हाॅईस नोट) वापर करुन संपर्क साधला. ‘तुम्ही मुंबईतील कस्टमच्या विमानतळवरील यंत्रणेला माहिती दिल्याने माझ्या साथीदारांविरुद्ध कारवाई झाली आहे. मी गेल्या ३० वर्षांपासून तस्करीच्या व्यवसायात आहे. माझे गुन्हेगारी टाेळ्यांशी संबंध आहेत. मी तुम्हाला धडा शिकवणार आहे. तुम्ही आणि कुटुंबीय पुण्यातून कसे बाहेर पडतो, हे बघतो,’ अशी धमकी आरोपीने त्यांना दिली. त्यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्याशी पु्न्हा संपर्क साधला. ‘मी दाऊद इब्राहिम टाेळीसाठी काम करत आहे. गेल्या ३० वर्षांपासून माझे संबंध आहेत’, अशी धमकी आरोपीने त्यांना दिली. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.