करोना काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर

पुणे : करोना संसर्गात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असलेल्या पौष्टिक सुकामेव्याच्या मागणीत १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. सुकामेव्याच्या मागणीत वाढ  झाली असली तर दर स्थिर असल्याची माहिती सुकामेव्याच्या व्यापाऱ्यांनी दिली.

करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर सुरुवातीला घाऊक बाजारपेठातील व्यापारावर परिणाम झाला होता. निर्बंध शिथिल झाल्यानंतर व्यापार सुरळीत झाला. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सुकामेवा उपयुक्त असल्याने गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून सुकामेव्याच्या मागणीत वाढ झाली आहे. मागणीत १५ ते २० टक्के वाढ झाली असली तरी सुकामेव्याचे दर स्थिर आहेत, अशी माहिती मार्केटयार्डातील सुकामेव्याचे व्यापारी पूरणचंद अँड सन्सचे सतीश गुप्ता आणि आशीष गुप्ता यांनी दिली.

काजू, बदाम, बेदाणा, अक्रोडच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या बाजारात कोल्हापूर जिल्ह्य़ातील चंदगड, तसेच मंगळुरू, गोवा, केरळ येथून काजूची आवक होत आहे. बदामची आवक अमेरिकेतील कॅलेफॉर्नियातून होत आहे. इराणमधील मॉमेरोन जातीच्या बदामाची आवक होत आहे. बेदाण्याची आवक सांगली येथील बाजारातून होत आहे. बेदाणाच्या नवीन हंगामाची सुरुवात झाली असून मागणी चांगली आहे. अक्रोडची आवक दक्षिण अमेरिकेतील चिलीतून होत आहे. अमेरिकेतून अक्रोडची आवक होत असली तरी चिलीच्या अक्रोडची प्रतवारी चांगली आहे. इराण आणि अमेरिकेतून पिस्त्याची आवक होते. पुढील महिन्यात काश्मीरमधील अक्रोडचा हंगाम सुरू होणार आहे. थंडीत सुकामेव्याच्या मागणीत वाढ होते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुकामेव्याला चांगली मागणी राहते, असेही त्यांनी सांगितले.

सुकामेव्याचे किलोचे दर

’ काजू- ८०० ते ९०० रुपये

’ बदाम- ६०० ते ६५० रुपये

’ बेदाणा- १६० ते २२५ रुपये

’ पिस्ता खारा- ७५० ते ९०० रु.

’ अक्रोड- १३०० ते १४०० रु.

सुकामेव्यामुळे  प्रतिकारशक्ती वाढते. सुकामेव्यात ‘क’ जीवनसत्त्व अत्यल्प प्रमाणात असते. मात्र, सुकामेव्यात क्षार आणि जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. फळभाज्या आणि फळांमध्ये ‘क’ जीवनसत्त्व मुबलक असते. आहार सर्वसमावेशक असावा. सुकामेवा जरी महाग असला तरी त्यात पोषणमूल्य भरपूर आहे.

इतरही फायदे आहेत. मात्र, सुकामेव्याचे सेवन बेताने करावे. अन्यथा पित्त,बद्धकोष्ठता, मूळव्याध अशा विकारांना सामोरे जावे लागते. करोनामुळे सुकामेव्याच्या मागणीत वाढ झाली आहे. विलगीकरणात तसेच रुग्णालयात असलेले करोनाबाधित सुकामेवा बाळगतात. फळे खराब होतात. त्यातुलनेत सुकामेवा वागवणे सोपे आहे.

– अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ