पुण्यात एक भरधाव कार लोहमार्ग पोलीस मुख्यालयाच्या सीमाभिंतीवर आदळून घडलेल्या अपघातात, चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याशिवाय या कारमधील दोन जण जखमी देखील झाले आहेत.

प्रशांत अप्पा अमशेट्टे (वय ३५, रा. सोमेश्वरवाडी, पाषाण) असे मृत्युमुखी पडलेल्या कार चालकाचे नाव आहे. तर, ईशान विश्वजीत गोडबोले (वय २०, रा. अष्टविनायक प्रसाद, पाषाण), प्रणीत प्रमोद निम्हण (वय २१, रा. जय भवानी बंगला, पाषाण) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

कारचालक प्रशांत शनिवारी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास संगम पुलावरून भरधाव संचेती रुग्णालयाकडे जात होता. त्या वेळी त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि लोहमार्ग पोलिसांच्या मुख्यालयाच्या सीमाभिंतीवर जाऊन भरधाव कार आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की प्रशांतचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर खडकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात गंभीर जखमी झालेले कारमधील ईशान आणि प्रणीत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक वैशाली सुळ तपास करत आहेत.