लोणावळा : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मोटारीचे चाक पंक्चर झाल्याची बतावणी करुन वाहनचालकांची फसवणूक करणाऱ्या पंक्चर दुकानातील सहा जणांच्या विरोधात वडगाव मावळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत पियुष अशोककुमार अरोरा (वय २९, रा. ऑर्चिड लोढा गोल्डन ड्रिम, कोनीगाव, डोंबिवली) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अब्दुल रहीम रशीद, रशीद अब्दुल रहिम अली (दोघे सध्या रा. वडगाव मावळ, मूळ रा. कानपूर, उत्तरप्रदेश) यांच्यासह सहाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करणात आला आहे.

पियुष अरोरा आणि संतोष बनसोडे (वय २९, रा. बोराळे, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) मोटारीतून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन जात होते. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी मोटारचालक अरोरा आणि बनसोडे यांना मोटार थांबविण्यास सांगितले. मोटारीच्या चाकातील हवा कमी झाली असून चाक पंक्चर झाल्याची बतावणी दोघांनी केली. त्यानंतर मोटारचालक अरोरा आणि बनसोडे यांना वडगाव मावळमधील शहानवाज टायर शॅाप दुकानात नेले. तेथे मोटारीच्या चाकातील पंक्चर काढण्याच्या बहाणा करुन आरोपींनी टायरला टोचा मारला. टायरचे नुकसान केले.

पंक्चर नसताना आरोपींनी पंक्चर काढण्यासाठी दोघांकडून एकूण मिळून १५०० रुपये घेतले. टायरचे नुकसान केले. अरोरा आणि बनसोडे यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज कदम, सिद्धार्थ वाघमारे, गणपत होले, आशिष काळे यांनी तातडीने तपास करुन आरोपीं विरोधात कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले.

महामार्गावर पंक्चर टोळी

मुंबई-पुणे महामार्गावर देहूरोड, वडगाव मावळ, लोणावळा, वरसोली भागातील काही पंक्चर दुकानदार आणि साथीदार दुचाकी आणि मोटारीच्या चाकातील हवा कमी झाल्याची बतावणी करुन वाहनचालकांची फसवणूक करत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. वाहनचालकांकडे बतावणी करुन फसवणूक करणाऱ्या पंक्चर दुकानदार तसेच साथीदारांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.