पुणे : मद्यपी मुलाचे वडिलांशी भांडण झाल्यानंतर त्याने वडिलांच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना दांडेकर पूल परिसरात घडली. गंभीर होरपळलेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रवीन्द्र भालेराव (वय ६१, रा. सर्व्हे क्रमांक १३०, दांडेकर पूल) असे मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी सागर रवीन्द्र भालेराव (वय २७, रा. दांडेकर पूल) याला अटक करण्यात आली. पर्वती पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र भालेराव हे सुतार काम करत होते. त्यांचा मुलगा सागर त्यांना कामात मदत करायचा. सागरला दारूचे व्यसन असून, तो अविवाहित आहे. ७ फेब्रुवारी रोजी त्यांच्यात वाद झाला होता. त्याने दुचाकीतील पेट्रोल काढून वडिलांच्या अंगावर ओतले. पेट्रोल ओतल्यानंतर त्याने वडिलांना पेटवून दिले. रहिवाशांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. गंभीर होरपळलेल्या रवींद्र यांना तातडीने ससून रुग्णालायात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. वडिलांचा खून केल्याप्रकरणी सागर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र महाले तपास करत आहेत.
गगनचुंबी इमारतीतील सदनिकेत आग
बी. टी. कवडे रस्त्यावरील एका सोसायटीत १७ व्या मजल्यावर असलेल्या सदनिकेत आग लागली. सिलिंडरचा स्फोट झाल्याने भडका उडाला. सदनिकेतील रहिवासी कामानिमित्त बाहेर पडल्याने गंभीर दुर्घटना टळली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही.
सिलिंडरच्या स्फोटात सदनिकेतील गृहोपयोगी साहित्य जळून भस्मसात झाले, अशी माहिती अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनवणे यांनी दिली. घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर गगनचुंबी इमारतीतील १७ व्या मजल्यावरील सदनिकेत सचिन ननावरे आणि कुटुंबीय राहायला आहेत. बुधवारी सकाळी ननावरे दाम्पत्य कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांची मुलगी शाळेत गेली. सदनिका बंद होती. सकाळी अकराच्या सुमारास सदनिकेतून धूर येत असल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली.
अग्निशमन दलाचे चार बंब, टँकर घटनास्थळी दाखल झाले. सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग भडकली. सदनिकेत कोणी नसल्याने गंभीर दुर्घटना टळली. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. जवानांनी आग इतरत्र पसरू न देण्याची काळजी घेतली. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही.
