पुणे : अंदमानमध्ये सर्वसाधारण कालावधीच्या तुलनेत तब्बल सहा दिवस आधी दाखल झालेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाचा प्रवास सध्या मंदावला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मोसमी वाऱ्यांची आगेकूच ठप्प आहे. मात्र, अंदमान, निकोबार बेटांसह पूर्वोत्तर राज्यांत सध्या जोरदार पाऊस होत असून, उत्तरेकडील राज्यातही पावसाळी स्थिती आहे. महाराष्ट्रात मात्र, गेल्या दोन दिवसांपासून बहुतांश भागात कोरडय़ा हवामानाची स्थिती आहे.

अंदमानात १६ मे रोजी दाखल झालेले मोसमी वारे बंगालच्या उपसागरात एकदिवसाआड प्रगती करीत होते. बंगालच्या उपसागरात ते १७ आणि १९ मे रोजी जागेवरच होते. दुसरीकडे १६ ते १९ मे या कालावधीत अरबी समुद्राच्या बाजूने त्यांची प्रगती नव्हती. २० मे रोजी मोसमी वाऱ्यांनी दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश केला आणि त्याच दिवशी बंगालच्या उपसागरातही प्रगती केली. त्यामुळे अरबी समुद्रात त्यांची झपाटय़ाने प्रगती होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, २१ आणि २२ मे रोजी मोसमी वाऱ्यांची आगेकूच झाली नाही.

महाराष्ट्रातील प्रवेशाबाबत उत्सुकता

पुणे : नैर्ऋत्य मोसमी पावसाचा प्रवास मंदावल्याने हवामान विभागाने जाहीर केलेल्या तारखांना केरळ आणि महाराष्ट्रात त्याचे आगमन होईल का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मोसमी पाऊस केरळमध्ये २७ मे, तर महाराष्ट्रात ५ जूनला प्रवेश करण्याबाबतचा अंदाज भारतीय हवामान विभागाने यापूर्वी व्यक्त केला होता.