क्रिकेट, बुद्धिबळ, हॉकी, बॅडिमटन अशा बहुतांश क्रीडा संस्थांच्या सर्वोच्चपदी राजकीय व्यक्ती विराजमान आहेत. राजकारणाच्या या वाढत्या हस्तक्षेपामुळे राज्यातीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील क्रीडा क्षेत्र दूषित झाले, अशी टीका भारतीय किक्रेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी येथे केली.
‘डीएसके गप्पा’ या कार्यक्रमात वेंगसरकर यांची मुलाखत सुनंदन लेले व राजेश दामले घेतली. त्या वेळी त्यांनी मनमोकळय़ा गप्पा मारल्या. वेंगसरकर म्हणाले की, राजकीय नेत्यांना क्रीडा क्षेत्राकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही, त्यामुळे राजकारण्यांनी अशा संस्थांच्या पदावर नसावे. त्यांना वेळ नसल्याने त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून या संस्था चालवल्या जातात. त्यामुळेच मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे वाटोळे झाले आहे.
राजकीय व्यक्तींना प्रसिद्धी व वलयाचे प्रचंड आकर्षण असते. परंतु, त्यामुळे खेळाचे नुकसान होते. ज्यांचा खेळाशी अजिबात संबंध नाही, अशा अनेक राजकारण्यांची नावे घेता येतील. भारतीय क्रिकेट संघ अव्वल स्थानावर कसा येईल याविषयी बोलण्याऐवजी बीसीसीआयमध्ये सध्या काय सुरू आहे, हे मी वेगळे सांगण्याची गरज नाही, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. क्रीडा क्षेत्राची सध्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे. राजकारण्यांनी आपला हस्तक्षेप टाळला आणि संबंधित खेळातील तज्ज्ञांना संस्थेच्या अध्यक्षपदाची संधी दिली तरच आताच्या बिघडलेल्या परिस्थितीवर मात करणे शक्य होईल, असा आशावादही वेंगसरकर यांनी व्यक्त केला.
मॅच फिक्सिंगमुळे क्रिकेट बदनाम
खेळाडूंच्या क्षमतेपेक्षा वशिलेबाजी व पशाच्या जोरावर त्यांचा निकष लागत आहे. पशातून प्रसिद्धी आणि प्रसिद्धीतून पसा अशा विचित्र कचाटय़ात क्रिकेट अडकले आहे. यातूनच मॅच फिक्सिंगसारखे वेदनादायी प्रकार घडत असून यामुळे संपूर्ण क्रिकेट क्षेत्र बदनाम झाले असल्याची खंत वेंगसरकर यांनी व्यक्त केली.