एटीएममधून मिळणाऱ्या हजार, पाचशेच्या करकरीत नोटांच्या जमान्यात शहरात सध्या चिल्लर भलताच ‘भाव’ खात असल्याचे दिसते आहे. सुटय़ा पैशांची चणचण भासत असल्याने टपरीधारक, छोटे दुकानदार व ग्राहकांचीही डोकेदुखी वाढली आहे. व्यवसायासाठी सुटे पैसे मिळविण्यासाठी प्रसंगी १५ ते २० टक्के जादा रक्कम मोजावी लागत आहे.
पानाच्या टपऱ्या, चहा व विविध खाद्यपदार्थाच्या टपऱ्या, किराणा मालाची छोटी दुकाने आदी ठिकाणीच्या वस्तूंचे दर लक्षात घेतले, तर दिवसभरात प्रत्येक व्यावसायिकाला मोठय़ा प्रमाणावर सुटय़ा पैशांची गरज असते. प्रामुख्याने पाच, दोन व एक रुपयांच्या नाण्यांची मोठय़ा प्रमाणावर गरज असते. मात्र, सध्या याच नाण्यांची सध्या टंचाई निर्माण झाली आहे. एखादी छोटी वस्तू किंवा खाद्यपदार्थ घ्यायचा झाल्यास, ‘सुट्टे आहेत का’ असा प्रश्न सुरुवातीलाच केला जातो. मोठय़ा प्रमाणावर सुट्टे पैसे ग्राहकाला परत द्यावे लागणार असतील, तर ‘सुट्टे नाहीत’ असे उत्तर दिले जाते.
अनेकदा ग्राहक व व्यावसायिकामध्ये सुटय़ा पैशांवरून वाद निर्माण होत असतात. सुटय़ा पैशांच्या टंचाईमुळे हे वाद पुन्हा सुरू झाले आहेत. काही व्यावसायिकांनी पूर्वीप्रमाणे सुटय़ा पैशांच्या बदल्यात एखादे चॉकलेट देण्याचा प्रकार सुरू केला आहे. आठ-नऊ रुपये किंमत असलेली एखादी वस्तू सुटय़ा पैशांच्या टंचाईतून सुटण्यासाठी दहा रुपयांना करण्याचेही प्रकार होत आहेत. व्यवसाय चालविण्यासाठी सुटे पैसे गरजेचे असल्याने ते मिळविण्यासाठी सध्या छोटय़ा व्यावसायिकांना मोठी करसत करावी लागत असल्याचे चित्र आहे. शहरात काही व्यापाऱ्यांकडे नाणी मिळतात. मात्र, शंभर रुपये दिल्यास ८० ते ५० रुपयांचीच चिल्लर दिली जाते.  त्यामुळे पूर्वी पाच ते दहा रुपयांपर्यंत असलेली टक्केवारी आता पंधरा ते २० टक्क्य़ांपर्यंत पोहोचल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले.
पाच रुपयांची नवी नाणी मागील काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर बाजारात आली होती. मात्र चकचकित दिसणारी ही नाणी अनेक लोक साठवून ठेवत असतात. त्यामुळेही बाजारात सुट्टय़ा पैशांच्या टंचाईत भर पडत असल्याचे बोलले जाते.
भिकाऱ्यांनाही द्यावी लागते टक्केवारी
सुटय़ा पैसे मिळविण्यासाठी अनेक व्यावसायिक भिकाऱ्यांकडे जमलेली चिल्लर घेऊन त्यांना नोटा देत असतात. भिकाऱ्यांना प्रामुख्याने एक, दोन रुपयांची नाणी लोकांकडून दिली जातात. ही नाणी काही ठरावीक व्यावसायिकांना देऊन ही मंडळी नोटा घेतात. सध्या चिल्लरची टंचाई वाढल्याने भिकाऱ्यांचाही दर वाढला आहे. त्यांनाही सुटय़ा पैशांच्या बदल्यात सुमारे १० ते १५ टक्के जास्त रक्कम द्यावी लागते, असे एका विक्रेत्याने सांगितले.