पुणे : भरधाव डंपरच्या धडकेत मोटारीतील पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर फाटा परिसरात घडली. याप्रकरणी डंपरचालकाविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अभिजीत सुरेश पवार (वय ३६), सुरेश प्रभाकर पवार (वय ६२ रा. बकोरी फाटा, वाघोली) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. प्रणिता पवार, रियांश पवार, सुलोचना पवार अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी डंपरचालक संदेश लक्ष्मणराव पवार (वय ३३ ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत पवार (वय ३१) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत सोमवारी (१ सप्टेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास कुटुंबीयांसह मोटारीतून निघाले होते. पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊऱ फाटा परिसरात भरधाव डंपरने मोटारीला धडक दिली. अपघातात मोटारीतील अभिजीत आणि त्यांचे वडील सुरेश यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात अभिजीतची वहिनी प्रणिता, आई सुलोचना, मुलगा रियांश गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे तपास करत आहेत.