scorecardresearch

दसरा मेळावा, ‘भारत जोडो’मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा काय संबंध? ; शरद पवार यांचा सवाल

एका पक्षाचे दोन भाग झाले आहेत. पण, त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण बिघडणार नाही याची खबरदारी प्रमुख नेत्यांनी घ्यायला हवी.

दसरा मेळावा, ‘भारत जोडो’मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा काय संबंध? ; शरद पवार यांचा सवाल
शरद पवार (संग्रहित फोटो)

पुणे : दसरा मेळावा हा शिवसेनेचा आहे. तो वेगळा पक्ष आहे. या दसरा मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार नाही. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा हा त्या पक्षाचा कार्यक्रम आहे. त्यांचे नेते त्यामध्ये सहभागी होत आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पडणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले. पवार यांच्या हस्ते एका कार्यक्रमात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना ‘महर्षी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.पवार म्हणाले की, दसरा मेळाव्यावरून जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे. एका पक्षाचे दोन भाग झाले आहेत. पण, त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण बिघडणार नाही याची खबरदारी प्रमुख नेत्यांनी घ्यायला हवी. दसरा मेळाव्याला भूमिका मांडताना कटुता वाढणार नाही, याची दक्षता घेतली जावी.

शिवसेनेसोबत सरकार स्थापनेचा २०१४ मध्ये कुठलाही प्रस्ताव आला असता, तर पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला समजले असते. या विषयावर अशोक चव्हाण काही बोललल्याचे मला तरी माहिती नाही, अशा शब्दांत पवार यांनी अशोक चव्हाण यांच्या विधानासंदर्भातील प्रश्नाविषयी भाष्य केले. अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी पाठिंबा देणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : ..तेव्हा माझ्या डोळ्यांत पाणी आले ; शरद पवार यांची कबुली

मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण द्यावे, अशी मागणी होत आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असे विचारले असता, आम्ही कधीही अशी मागणी केलेली नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. यासंदर्भातील निर्णय राज्य सरकारने घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या