पुणे : शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अपुरी संख्या आणि अस्वच्छतेच्या पार्श्वभूमी वर मोठा गाजावाजा करत शहरात यांत्रिकी पद्धतीने चालणारी आणि अत्याधुनिक सुविधा असलेली स्वच्छतागृहे (ई-टॉयलेट्स) सुरू करण्यात आली. मात्र देखभाल दुरुस्ती अभावी त्यांची दुरवस्था झाल्याने बहुतांश ई-टॉयलेट्स बंद असल्याची वस्तुस्थिती आहे. संबंधित कंपनीकडून देखभाल दुरुस्ती करण्यास असमर्थता दर्शविण्यात आल्याने आता नव्याने निविदा काढण्यात येणार असून ई-टॉयलेट्सचे स्थलांतर करण्याचे नियोजित असले तरी ही योजनाच गुंडाळली गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून शहरात पंधरा ठिकाणी स्वच्छतागृहे बसविण्यात आली. जंगली महाराज रस्ता, मॉडेल कॉलनी, भांडारकर रस्त्यावरील हिरवाई गार्डन, गोखले (फग्र्युसन) रस्ता, सेनापती बापट रस्ता, विठ्ठलवाडी सिंहगड रस्ता, नीलायम चित्रपटगृहाशेजारील पूल, विमाननगर, वाडिया महाविद्यालयाजवळ आणि तळजाई टेकडी, एलएमडी चौक बावधन अशा १५ ठिकाणी अत्याधुनिक स्वयंचलित ई-टॉयलेट्स बसविण्यात आली आहेत. येथे एकूण २१ आसने आहेत. चार वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत स्वच्छतागृहे बसविण्यात आली मात्र त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने गेल्या तीन वर्षांपासून स्वच्छतागृहे बंद असल्याचे आढळून आले होते. या यांत्रिक स्वच्छतागृहांची तोडफोडही केली.
शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची कमतरता असताना त्यातही पुरुषांच्या स्वच्छतागृहांपेक्षा महिलांच्या स्वच्छतागृहांची संख्या खूप कमी असल्याने ई-टॉयलेट्सचा पर्याय पुढे आला. ई-टॉयलेट्सची दुरवस्था, वापराविना पडलेली ई-टॉयलेट्स आणि त्यांची मोडतोड याची वस्तुस्थिती ‘लोकसत्ता’ने सातत्याने मांडली. त्यानंतर ई-टॉयलेट चालविण्यासाठी महापालिकेने निधी उपलब्ध करून दिला. संबंधित कंपनीने त्याची देखभाल दुरुस्ती करावी, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र कंपनीकडून असमर्थता दर्शविण्यात आल्याने स्वच्छतागृहे चालविण्यासाठी नव्याने निविदा काढली जाणार आहे. मात्र निविदा काढल्यानंतरही त्याला प्रतिसाद मिळण्याबाबत साशंकतता असल्याने योजना गुंडाळली गेल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने स्वच्छतागृहांचे स्थलांतर करणार असून पालिकेची उद्याने, शाळा येथे त्यांचे स्थलांतर करण्यात येणार आहे.
दुरवस्थेवर उपाय
शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांतील अस्वच्छता आणि त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर आल्याने शहरात स्वच्छ, टापटीप आणि यांत्रिकी पद्धतीवर आधारित स्वच्छतागृहे सुरू करण्यात आली. त्यानुसार पंधरा ठिकाणी ही सुविधा देण्यात आली. पूर्णपणे यांत्रिकी पद्धतीचा अवलंब, यांत्रिकी पद्धतीने स्वयंचलित पद्धतीने होणारी नियमित साफसफाई ही या ई-टॉयलेटची वैशिष्टय़े आहेत. विशेष म्हणजे ही नवी ई-टॉयलेट देशपातळीवरही नावाजली आहेत.
या स्वच्छतागृहांची वैशिष्टय़े
मानवविरहित आणि स्वयंचलित प्रणाली ही स्वच्छतागृहांची वैशिष्टय़े आहेत. स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी नाणे (कॉईन) टाकल्यानंतरच त्याचा वापर करता येतो. स्वच्छतागृहाचा वापर झाल्यानंतर तत्काळ त्याची साफसफाई यंत्राद्वारे होते. साफसफाई झाल्याशिवाय त्याचा वापर करता येत नाही. त्यामुळे स्वच्छता कायम राहण्यास मदत होणार आहे. अपंग व्यक्तींसाठी स्वतंत्र रॅम्प आणि लोखंडी बारची यामध्ये व्यवस्था आहे.