पुणे : ‘पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण वाढल्यानंतरही ग्राहकांना स्वस्त पेट्रोल मिळत नाही. याउलट कमी मायलेजमुळे इंधनाचा आणि इथेनॉलमुळे देखभाल-दुरुस्ती खर्च वाढला आहे, असे आरोप आम आदमी पक्षाने (आप) केले आहेत.

या धोरणामुळे नुकसान झालेल्या वाहनधारकांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थाकडे निघालेल्या अरविंद केजरीवाल यांची पोलीसांनी अडवणूक केली. या धोरणामुळे अमेरिकेला फायदा मिळत असून, त्याची माहिती पारदर्शकपणे मांडली जात नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

इथेनॉल आयातीतून अमेरिकेला फायदा मिळत आहे. त्यामुळेच तर हे धोरण आणले आहे का? ई-२० धोरणाची अंमलबजावणी घाईघाईने, पुरेशी तयारी न करता आणि वाहनधारकांच्या हिताचा पुरेसा विचार न करता का करण्यात आली?,’ असे सवाल ‘आप’च्या नेत्यांनी केले.

‘‘ई-२०’ धोरणाबाबत नागरिकांच्या समस्या आणि प्रत्यक्ष अनुभव सरकारसमोर मांडण्यासाठी शुक्रवारी (१४ ऑगस्ट) एक वाजता शिवाजीनगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात संवादसभेचे आयोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती पक्षाचे नेते विजय कुंभार, डॉ. अभिजीत मोरे, मुकुंद किर्दत यांनी पत्रकार परिषदेत दिली. अमित म्हस्के, रविराज काळे, सुदर्शन जगदाळे, धनंजय बेनकर, संजय कोने, ऋषीकेश कनवटे, सुभाष करांडे आदी या वेळी उपस्थित होते. दरम्यान, ‘आप’ने आयोजित केलेल्या या संवादसभेत ऑनलाइन माध्यमाद्वारेही सहभागी होता येणार असून, https://stope20petrol.com/nationaltownhall?event=MH-01 या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

‘आप’ने उपस्थित केलेले प्रश्न

  • पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळल्यानंतरही पेट्रोलच्या किमती का कमी झाल्या नाहीत?
  • वाहनधारकांच्या वाढलेल्या इंधन, देखभाल-दुरुस्ती खर्चाची जबाबदारी कोणाची? आर्थिक नुकसानाची भरपाई कोण करणार?
  • जुन्या वाहनांवर ‘ई-२०’चा काय परिणाम होतो? या वाहनधारकांना कोणती मदत उपलब्ध आहे?
  • पुरेशी पूर्वतयारी आणि संक्रमणाचा कालावधी न देता ‘ई-२०’ धोरणाची अंमलबजावणी कशासाठी?
  • ई-२० धोरणाबाबतचे अहवाल, आकडेवारी केंद्र सरकार पारदर्शकपणे जनतेसमोर का मांडत नाही?
  • ई-२० धोरणामुळे निदान शेतकऱ्यांचे तरी उत्पन्न वाढले का?
  • भारत-अमेरिका व्यापार चर्चेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतून इथेनॉलच्या वाढत्या आयातीबाबत सरकारची भूमिका काय?