Premium

यंदा विसर्जन मिरवणुकीची लवकर सांगता? ‘दगडूशेठ’नंतर अन्य मंडळांना मार्गस्थ करण्याचा पोलिसांचा निर्णय

यंदा विसर्जन मिरवणुकीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने लवकर सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

ganesh visarjan
विसर्जन सोहळ्यात विविध मार्गांवरुन तीन हजार ८६५ मंडळे सहभागी होणार आहेत.(फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : यंदा विसर्जन मिरवणुकीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने लवकर सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळ बेलबाग चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर मुख्य मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या अन्य प्रमुख मंडळांना त्वरित मार्गस्थ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी (२८ ऑगस्ट) होणार आहे. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता या मार्गांवरुन विविध मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. विसर्जन मिरवणुकीनिमित्त शहरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी बंदोबस्ताबाबतची माहिती मंगळवारी (२६ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत दिली. सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर. राजा, वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल आदी यावेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-विसर्जन सोहळ्यासाठी पुण्यातील ‘हे’ १७ रस्ते राहणार उद्या बंद

विसर्जन सोहळ्यात विविध मार्गांवरुन तीन हजार ८६५ मंडळे सहभागी होणार आहेत. शहर तसेच उपनगरात साडेआठ हजार पोलीस बंदोबस्तात राहणार आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडी (एसआरपीएफ) बंदोबस्तास राहणार आहेत. गृहरक्षक दलाचे जवान, पोलीस मित्र बंदोबस्तात सहाय करणार आहेत. लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य विसर्जन सोहळ्यावर २०५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. बाँबशोधक नाशक पथक (बीडीडीएस), शीघ्र कृती दलाची तुकडी बंदोबस्तास राहणार आहे. विसर्जन मिरवणूक सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणूक लवकर आटोपण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत, असे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी नमूद केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने यंदा विसर्जन मिरवणूक सोहळ्यात लवकर सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बेलबाग चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर मुख्य मिरवणुकीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अन्य प्रमुख मंडळांना मार्गस्थ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-‘म्हाडा’च्या घरांसाठी मिळणार ७० हेक्टर जमीन, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात आहेत जमिनी

ढोलपथकांसाठी नियमावली

विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या ढोलपथकांच्या प्रमुखांना नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रमुख मंडळांसह अन्य मंडळांच्या मिरवणुकीत दोन ते तीन पथके सहभागी होणार आहे. ५० ढोल तसेच १५ ताशावादकांचे सादरीकरण करण्यात येईल. बेलबाग चौक, सेवासदन चौक (लिंबराज महाराज चौक), टिळक चौकात ढोलपथकांना सादरीकरणासाठी दहा मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आली आहे, असे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल्ल यांनी सांगितले.

दृष्टीक्षेपात विसर्जन बंदोबस्त

  • आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त
  • लक्ष्मी रस्त्यासह प्रमुख विसर्जन मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे
  • विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी पोलीस मदत केंद्र
  • गर्दीत भाविकांना त्वरित मदत करण्याच्या सूचना
  • रुग्णवाहिका, आपत्कालिन परिस्थितीत विशेष मार्ग
  • ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलांना त्वरित मदत
  • इलेक्ट्रॉनिक फलकावर भाविकासांठी वेळोवेळी सूचना
  • चोरी, छेडछाड रोखण्यासाठी पथक

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Early end of ganesh visarjan this year police decision to divert other mandal after dagdusheth mumbai print news rbk 25 mrj

First published on: 27-09-2023 at 12:11 IST
Next Story
तलाठी परीक्षेच्या उमेदवारांसाठी उद्यापासून उत्तरतालिका पाहण्याची सुविधा