शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात ‘टीईटी’मध्ये घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली. पण याच प्रकरणात शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर प्रदेश अध्यक्षा विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी ईडी सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अब्दुल सत्तारांना शिक्षणमंत्री करावं, अशी मागणी करीत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

यावेळी विद्या चव्हाण म्हणाल्या की, “महाविकास आघाडी सरकारमध्ये अब्दुल सत्तार हे मंत्री राहिले आहेत. याच महाविकास आघाडी सरकारच्या काळात टीईटी घोटाळासमोर आला होता. त्यामध्ये हजारो विद्यार्थी अपात्र असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यावर महाविकास आघाडी सरकारने संबधीत अधिकाऱ्यांवर कारवाई देखील केली. पण आता अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावं याच टीईटी घोटाळयामध्ये समोर आली. त्यामुळे आता ईडी सरकार कोणावर कारवाई करते हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.”

कोल्हापूर : अब्दुल सत्तार यांना शिक्षणमंत्री करायला हवे – पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला टोला!

तसेच “आता ईडी सरकार मंत्रीमंडळ विस्तार करणार आहे. त्यामध्ये अब्दुल सत्ताराना शिक्षण मंत्री करा.”, अशी मागणी करीत त्यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला.